मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकडे बंगालमध्ये, इकडे महिला विनयभंग हाेताहेत, अंमली पदार्थांची प्रकरणे बाहेर येते आहेत. पण यांना बंगाल जिंकायचाय. दोन लाख सीआरपीएफचे जवान तिकडे उतरवले, पश्चिम बंगालमध्ये वाघीण एकटीच लढतेय, त्या जिंकल्याच पाहिजेत, असे विधान करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देताना भाजपवर जोरदार टीका केली.
भारतीय कामगार सेनेची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृहात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना एखाद्या संघटनेने ५८ वर्षे नेतृत्व करणे येड्या गबाळ्याचे काम नाही. यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी साळवी यांची आठवण सांगताना त्यांनी संघटनेचे काम करण्यासाठी आली नोकरी सोडली. त्यांनी केलेल्या कामामुळे हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या, याची आठवण त्यांनी सांगितली. लोक येतात जातात त्यांची कर्म त्यांच्यासोबत जातात. ज्यांना जायचे असेल त्यांनी जरूर जा, पण जे गेलेत त्यांचे काय झालेय हे त्यांना विचारा. माणसे विकली जात आहेत. युनियन क्षेत्रात दुकानदारी सुरू आहे, असे म्हणत कामगार क्षेत्रातील सद्यस्थितीवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केले.
अमेरिका इराण युद्ध सुरू आहे, ते लेझीम सारखे चालू आहे. दुबईमध्ये उत्तर भारतीय काम करत आहेत. देश म्हणतोय परत या…पण ते म्हणताय देशात येऊन बेकारीने मरण्यापेक्षा आम्ही बॉम्बने मरू. मेलो तरी चालेल पण काम सोडून माझ्या देशात जाणार नाही. असे ते कामगार का म्हणताहेत याकडे कोणाचे लक्ष जात नाही, असे म्हणत ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही हिंदू आहोत बुरखे काय फाडणार?
नारी शक्ती विधेयकावरून गदारोळ सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणतायत विरोधकांचे बुरखे फाडणार, अरे आम्ही हिंदू आहोत बुरखे काय फाडणार? मुख्यमंत्री लोकसभेत होते का, असा सवाल त्यांनी केला. महिला आरक्षणाबद्दल एवढा कळवळा असेल तर संसदेचे उद्घाटन करताना आणि अयोध्या राम मंदिरावेळी राष्ट्रपतींना का बोलवले नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून का? असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महिला आरक्षण लागू करा मी आजसुद्धा म्हणतो लागू करा, हा नवा विषय नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी लोकसत्ताचा अग्रलेख वाचा रवीश कुमार यांचा एपिसोड पाहा, असेही सुचवले. राज्य कुटुंब नियोजन कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबवत असताना मोहन भागवत मुले जन्माला घाला सांगताहेत, मुले जन्माला घाला? त्यांना पोसणार कोण? त्यानंतरच्या बेकारीचे काय, असा सवाल त्यांनी केला. यावेळी पहलगाम हल्ल्याला एक वर्ष झाले तरी अतिरेकी का पकडले गेले नाहीत, ते कुठे गेले कुठे असा सवाल त्यांनी केला.
