मुंबई : मतचोरीचा आरोप आम्ही करीत होतो तेव्हा भाजपची मंडळी आरोप फेटाळत होती. आशीष शेलार यांनीच मतदारयाद्यांमध्ये सुधारणा झाली पाहिजे, अशी मागणी केली. दुसरीकडे, शिवसेना ठाकरेंचीच असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावरून भाजपमध्ये शेलार वा पाटील या मंत्र्यांची सहनशीलता संपल्याचे लक्षण आहे, असा टोला लगावत, मतदारयाद्यांमधील घोळ सांगण्याचे धाडस शेलार यांनी केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे ‘पप्पू’ ठरविल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

‘मतचोरी झाल्याचा आरोप आम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीपासून करीत आहोत. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला. आमच्या आरोपांवर भाजपचे नेते आधी नाके मुरडत होते. भाजपच्या शेलार यांनी अखेर धाडस दाखविले. त्याबद्दल शेलार यांचे अभिनंदन,’ असे ठाकरे म्हणाले. मतदारयाद्यांमध्ये गोंधळ असल्याचे त्यांनी मान्य केले. मतदारयाद्यांमधील घोळाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जात आहोत. शेलार यांनीही त्यात सहभागी व्हावे. शिवसेना ही ठाकरे यांचीच, असे विधान लागोपाठ दोनदा केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचेही खूपखूप आभार, असेही ठाकरे यांनी सांगितले.

शेलार किंवा चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाच असावा. यामुळेच दोघांनीही सत्याची बाजू मांडल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला. शेलार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक प्रकारे ‘पप्पू’ ठरविल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

‘हिंदू-मुस्लीम-शीख भेद नाही’

मतदारयाद्यांमधील घोळाबाबत आशीष शेलार यांनी आमच्यावर काही आरोप केले. पण आम्ही हिंदू, मुस्लीम, शीख असा भेद करीत नाही. मतदारयादी स्वच्छ असावी एवढीच आमची अपेक्षा आहे. मतदारयाद्यांमध्ये अनेक नावे दुबार आहेत. ती वगळावी अशी मागणी केली जाते. आम्ही निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर भाजपचे नेते का उत्तरे देतात, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.