मुंबई : भाजप निवडणुका जिंकण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळत आहे. मतदार याद्यांमध्ये फेरफार करायचे, बोगस नावे घुसवायची असा कारभार करून त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. एसआयआरमधून दोन कोटी नावे वगळली गेली आहेत, त्यामुळे आता गाफील न राहता प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या विभागातील मतदार यांद्यावर करडी नजर ठेवायला हवी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
शिवसेनेने बीड जिल्ह्यात नेमलेल्या ३९६ बुथप्रमुखांना शिवसेना भवन येथे विमा पॉलिसी व ओळखपत्राचे वाटप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. तुम्ही सर्व बीड विधानसभा मतदार संघामधून आलेला आहात. तुम्ही सर्व एका मतदारसंघामधून बीएलए या ठिकाणी आलेला आहात.
बीडमध्ये यापूर्वी शिवसेनेची आणि भाजपाची युती होती, तेव्हाची ही युती फार वेगळी होती. आता सारखे तेव्हा नव्हते. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमाखातर बीड जिल्ह्यातील बऱ्याच जागा आपण भाजपाला सोडल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला की त्यामुळे बीडमधील शिवसेनचे अस्तित्व हळहळू कमी होत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा बीड जिल्हा भगवा करण्याची संधी आपल्याला आली आहे, असे सांगत मतदार याद्यांमध्ये होणाऱ्या फेरफारांवर लक्ष ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ हा जुना मंत्र पुन्हा प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा निकाल लागणार
‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे शिवसेनेचे राजकारण नाही. जनतेला पाणी, घर, निवारा आणि रोजगार मिळवून द्यायचा आहे. गाडगेबाबांच्या दशसूत्रीप्रमाणे सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अधिकार हवा आणि म्हणून आपल्याला सत्ता पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र पुन्हा भगवा करायचा आहे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. शिवसेनेच्या नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत. त्यांचा समाचार घेत चाललोच आहे आणि त्याचा निकाल लवकरच लागेल अशी आपल्याला खात्री आहे, असा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
लोकसभेत आपण विजय मिळवला होता. त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, त्यावेळी बोगस मतदार नोंदणीबाबत पहिल्यांदा केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे यजमान प्रभाकर यांनी आवाज उठवला होता. प्रभाकर यांनी सांगितले होते की लोकसभा ते विधानसभा या दरम्यान ४५ लाख मतदार जास्त नोंदवले गेले. मग ते कुठून आले होते, असा सवाल उपस्थित करत आता एसआयआरमध्ये २ कोटी मतदार वगळले गेले आहेत’, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
१७ सप्टेंबरला संभाजीनगरचा दौरा
शिवसेनेसाठी सत्ता हे साध्य नसून जनतेची प्रभावी सेवा करण्याचे साधन आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील प्रश्नांसाठी १७ सप्टेंबरला संभाजीनगर येथे होणाऱ्या आंदोलनात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दसऱ्याला शिवाजी पार्कवर पुन्हा भेट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
आपली खरी शिवसेना; त्यांची शहा सेना
शिवसैनिक हा सामान्य जनतेचा विश्वास असला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकातील महिला आणि नागरिकांना ‘शिवसैनिक हा माझा भाऊ आहे’ असा विश्वास वाटला पाहिजे, असे आवाहन करत आपला शिवसैनिक हा गद्दारी करणारा असूच शकत नाही. आपली खरी शिवसेना असून त्यांची शहा सेना आहे, असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.
