काहीही चोरता येतं पण संस्कार चोरता येत नाहीत. ज्याच्यावर संस्कार नसतात त्याला चोरीचा माल लागतो. स्वतःचे आई वडील अडगळीत टाकून दुसऱ्याचे आई बाप चोरायचे. नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलात पण ठाकरे कसे चोरणार? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे मुंबईतल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कडाडून टीका केली. यावेळी निवडणूक आयोगावरही त्यांनी टीका केली. या आयोगाला चुना लावणारा आयोग म्हटलं पाहिजे. कारण ते चुनाच लावण्याचं काम करत आहेत.
निवडणूक आयोगाविषयी काय म्हणाले उद्धव ठाकरे?
निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हणतात हिंदीत, मात्र या आयोगाला चुना लावणारा आयोग म्हटलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तरीही निवडणूक आयोगाने चोंबडेपणा केला आहे. निवडणूक आयोगावर आमचा विश्वास उडाला आहे. आता आमची आशा आहे की सर्वोच्च न्यायलायच्या सुनावणीवर. हा जो निकाल असेल तो फक्त शिवसेनेचा नाही तो देशाच्या भवितव्याचा असेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मराठी न्याय हक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे
ज्या एका हेतूने शिवसेनेची स्थापना शिवसेना प्रमुखांनी केली होती तो हेतू खूप चांगला होता. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. आत्ता ज्या काही पिढ्या आल्या आहेत त्यांना तो काळ सांगितला तर विश्वास बसणार नाही. मराठी माणूस म्हटलं की त्याला महाराष्ट्रात घाटी म्हटलं जायचं. त्या माणसाला शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना नावाची आत्मविश्वासाची तलवार दिली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांनी कुणाचे गुडघे टेका म्हटलं नव्हतं
आम्ही बाळासाहेबांचे विचार सांभाळतो म्हणतात ना ते त्यांनी कधीही कुणापुढे गुडघे टेका असं म्हटलं नव्हतं. उगाच कुणाच्या पालख्या वाहा असंही म्हटलेलं नव्हतं. जगाल तर आत्मविश्वासाने जगा आपल्या हिमतीवर जगा असं बाळासाहेब ठाकरे सांगत असत. बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आणीबाणीच्या वेळचा काळही मी पाहिला. शिवसैनिकांच्या घट्ट वीणेतून शिवसेना तयार झाली आहे. फुलं तोडली म्हणजे झाड मेलं असं कुणी समजत असेल तर तसं कुणीही ते समजू नये. नको त्या लोकांना मला उगाच महत्त्व द्यायचं नाही.
चोरांवर काय बोलायचं?
जे चोर आहेत त्या चोरांवर मी बोलणार नाही. चोरलेलं धनुष्यबाण त्यांच्यासोबत आहे. चोरलेलं नाव आणि धनुष्यबाण घेऊन निवडणुकीच्या मैदानात या, मी मशाल घेऊन मैदानात येतो असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनी दिलं आहे. शिवसेना प्रमुखांनी जे पेरलं आहे ते कसं आमच्यातून काढाल. मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरीही ते शक्य नाही. अन्याय जाळायचा असेल तर मशाल पेटवलीच पाहिजे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.