मुंबई: देशातील तरुण आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले असताना त्यांच्याशी संवाद साधायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही; मात्र महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात फुटीर झाालेल्या खासदारांना भेटण्यासाठी वेळ आहे. मोदी त्यांना ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, असा धीर देतात. त्यांचे हे वक्तव्य म्हणते सर्वोच्च न्यायालया धमकीवजा संदेश आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना हा संदेश आहे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू असतानाच ठाकरे गटाच्या फुटीर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत टीका केली. शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना, जे पंतप्रधान जेन-झींना नाही भेटले, ते गद्दारांना भेटतात. पंतप्रधान आणि शिंदे यांच्यातील भेट बंद दाराआडची असेल तर त्या चर्चेतील ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हे वाक्य बाहेर आणण्याचे कारण काय?, गद्दारांना आता नेमके भय कसले आहे? वॉशिंग मशीनमध्ये धुऊन घेतल्यानंतरही त्यांची पुन्हा पळापळ का होतेय, असा सवाल करताना गद्दारीचा डाग धुतला जात नाही, असे ठाकरे म्हणाले. याऐवजी पंतप्रधानांनी, ‘मी तुमच्या पाठीशी आहे, मी देशाचा पंतप्रधान आहे, तुमचा मोठा भाऊ आहे, आजोबा आहे किंवा मित्र आहे,’ असे रुणांना सांगायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला. करोनाच्या काळात आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होतो, तेव्हा ‘फेसबुकवरून सरकार चालत नाही’ असे सांगणाऱ्यांवर आता इन्स्टाग्रामवरून तरुणांशी संवाद साधण्याची वेळ आली आहे, अशी टिपणीही त्यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयावर विश्वास
तरुणांना व्हायरस संबोधले गेले मात्र ‘गद्दारीचा व्हायरस’ संपूर्ण देशात पसरत असून तो लोकशाहीचा जीव घेत आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्याची दखल आम्ही घेतली असून जनतेने आणि सर्वोच्च न्यायालयानेही घ्यावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. या संपूर्ण घटनाक्रमातील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय हे लोकशाहीचे रक्षक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले जात असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे,” असे ते म्हणाले.
तरुणांची नाराजी प्रवचनांनी दूर होणार नाही
तरुणांची नाराजी केवळ प्रवचनांनी दूर होणार नाही. सरकार तुमचे आहे, तुम्ही मेहनत करून ते आणले आहे, मग तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब का विचारला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.तरुणांमध्ये असलेला असंतोष गंभीर असून, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची गरज आहे. केवळ भाषणे किंवा सोशल मीडिया संदेशांनी हा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संवादावर केला.
