मुंबई : काँग्रेस शिवसेनेसोबत गेली असा आरोप करण्यात आला, पण शिवसेना काँग्रेससोबत गेली नाही. भाजपने त्यावेळी दगाबाजी आणि विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडी स्थापन केली, पण आता नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांच्याच पोस्टरवर सोनिया गांधींचे फोटो आहेत. जे मला शिव्या देत होते, त्यांच्या पोस्टरवर आनंद दिघे यांच्या बाजूला सोनिया गांधींचा फोटो दिसून येत आहे. ही सगळी लाचारी सत्तेसाठी सुरू असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केला. दिशाभूल झालेले अनेकजण पक्षाला सोडून गेले होते. पण आता ते पुन्हा परतत आहेत.
मधल्या काळात सर्वांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यात आली होती. त्याला काही कट्टर शिवसैनिकही बळी पडले. हवेत प्रदूषण आहे, तसे राजकारणातही प्रदूषण आहे. पण जी धुळफेक होती, ती आता स्पष्ट होत आहे. गद्दारी करताना कारण काय दिले होते की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले.
उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यामुळे आम्ही युती तोडली. पण आता त्यांनी त्यांचा गत काही वर्षांतील इतिहास पाहावा. त्यांना कल्याण-डोंबिवलीची सभा आठवेल. या सभेत ते म्हणाले होते की, त्यात भाजप शिवसेना व शिवसैनिकांवर कसा अत्याचार करतोय म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देत आहे. असे नाटक करणारा एक आपण पाहिला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवारांचे कारण दिले. अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत बसू शकत नाही. त्यानंतर काँग्रेससोबत बसू शकत नाही असे ते म्हणाले होते. पण आता ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
त्यांना तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर १ ला महत्त्व असते, नंबर २ वगैरे काहीही नसते. आज भाजपचे कार्यकर्ते शिवसैनिकांना मारहाण करत आहेत. पण हे हू का चू करू शकत नाहीत. मग याला लाचारी नाही तर काय म्हणायचे? पण मला त्याची चिंता नाही. कारण, ठाणे हा शिवसेनेचे बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
