गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला असून राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट बाहेर पडल्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असून देवेंद्र फडणवीसांनी एक पाऊल माघार घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर हे सरकार आधीच्या सरकारचे निर्णय बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याला सुरुवात आरेपासून झाली असून ठाकरे सरकारने कांजूरमार्गला नेलेलं मेट्रोचं कारशेड आरेमध्येच करणार असल्याचं एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केलं. त्यावरून सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच आज शिवसेना भवनात दाखल झाले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली. आरेच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारला सुनावतानाच मुंबईकरांच्या वतीने विनंती करतो, आरेचे कारशेड रेटू नका, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“माझा राग मुंबईवर काढू नका”

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता. म्हणजे तिथे वन्यजीव आहेत. मला धोका हा वाटतो की आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातलं वन्यजीवन धोक्यात येईल. असं करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल, असं देखील उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

आरेमध्ये बिबट्या आढळल्याची दृश्य

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग…”, उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन!

“..तर मेट्रो अंबरनाथ-बदलापूरपर्यंत”

“आम्ही मुंबईतलं जवळपास ८०० एकरचं जंगल राखीव करून टाकलं आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर ती मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray speaks on aarey metro car shed appeals cm eknath shinde pmw
First published on: 01-07-2022 at 15:01 IST