मुंबई : मराठी माणसासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झाला आहे. त्यामुळे मराठीसाठी आम्ही दोन भाऊ एकत्र आलो. पण त्याचेही क्रेडिट मुख्यमंत्री घेत आहेत, अशी टीका करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विंदा करंदीकर यांच्या कवितेचा संदर्भ दिला.
लढवून बांधवांना, संहार साधणारा… गिता खूशाल सांगे… इलाज काय त्याला… म्हणजेच “आधी भांडणे लावायची आणि नंतर आम्हीच सर्व केले असे सांगायचे,” असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.
मराठी भाषा दिनानिमित्त स्थानीय लोकाधिकार महासंघाच्याच्यावतीने ‘जागर मराठीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठी माणसासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झालेला आहे. त्यामुळे मराठीसाठी आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत.
पण दोन भावांना एकत्र आणले म्हणून आता मुख्यमंत्री त्याचे क्रेडिट घेत आहेत, असे सांगतानाच मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषेची सक्ती केली याचा मला अभिमान आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे वैष्यमही आहे कि महाराष्ट्रात मराठी सक्ती करण्याचा निर्णय घ्यावा लागतो त्याचा मला खेदही वाटतो, असे ठाकरे म्हणाले.
पण ही सक्ती कशाला पाहिजे, असा सवाल करत महाराष्ट्र म्हटले की मराठीच असली पाहिजे. पण जुने दळण दळण्याची त्यांची जुनी सवय आहे. हे दळण एवढे दळायचे की लोकं ते खरे मानायला लागतात. हिंदीच्या सक्ती संदर्भात कमिटी नेमली होती. त्या कमिटीने जो अहवाल दिला तो हातामध्ये घेतला. शब्दश: पाहिले तर तो अहवाल घेतला म्हणजे तो स्वीकारला होतो. पण तो स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी करायची की नाही यासाठी कमिटी नेमली होती. पण त्या कमिटीची बैठक झाली नाही.
तत्पूर्वी भाजपाने शिवसेना फोडली आणि सुरत, गोवा, गुवाहाटी अशी यात्रा काढली. त्याच्यात सरकार पडले, त्याच्यामुळे त्या कमिटीची बैठक झाली नाही. पण तो निर्णय आम्ही घेतला म्हणून तुम्ही तो निर्णय लादणार असाल तर असे अनेक निर्णय होते ते का रद्द केले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपचे ऑफिस उभे राहते पण मराठी भाषा भवन उभे राहत नाही. मराठी रंगभूमीचे दालन उभे राहत नाही असा संताप व्यक्त करत तुम्ही कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहात असा खरमरीत सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्राला एका प्रादेशिक पक्षाची गरज आहे आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना. पण मराठी माणूस हा कधी स्वार्थी वृत्तीने वागत नाही, तो आधी दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो. हा मराठी माणसाचा गुण आहे की दोष आहे ते अजूनही कळलेले नाही. मदतीला धावून जाणाऱ्याचाच गैरफायदा घेतला जातो. भाजपनेही आजवर हेच केले आहे. ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मागे तिथली जनता उभी राहते, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्षाच्या मागे येथील जनता उभी राहायला हवी, अशी विचारणा ठाकरे यांनी केली.
मुंबई पुन्हा शिवसेनेकडेच येणार!
मराठी भाषा दिन दिमाखात साजरा करा, असा आदेश देतानाच मुंबईत मराठी माणसाने ताकद दाखवली आहे. पण महापौर आपला झाला नाही याचा अर्थ पुन्हा होणार नाही असे नाही. मुंबई परत आपल्याकडेच येणार आहे आणि महाराष्ट्रही येणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लोकांच्या डोळ्यावरील पट्टी बाजुला होईल तसे तेथील लोकं चांगल्या मार्गावरून चालायला लागतील. सद्या ते भूतं गोळा करित आहेत. पण जेव्हा ही भुतं त्यांच्या मानगुटीवर बसतील तेव्हा तुम्हाला जीव नकोसा होईल, असेही ठाकरे म्हणाले.
हे रामराज्य नाही!
महाराष्ट्रात कोणीही येतोय हनुमान चालिसा शिकवतोय. आपल्याकडे समर्थांनी शिकवलेले मारुती स्तोत्र आहेच, रामरक्षा आपण बालवयापासून शिकत आलो आहोत. आज भगवतगीता वाटली जाते. पण आमच्या ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपण यापुढे एकमेकांना भगवतगीते ऐवजी ज्ञानेश्वरी द्यायला हवी. हनुमान चालिसा किंवा भगवत गीतेला विरोध नाही, पण आपली संस्कृती जपायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपकडून आता रामराज्य आल्याचे म्हटले जात आहे. पण हे रामाचे राज्य आहे का. रामाच्या राज्यात पक्ष फाेडले जात होते का, खोटे आरोप करून मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला तुरुंगात टाकले जात होते का, असा सवाल त्यांनी केला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवा, अशी मागणी उद्वव ठाकरे यांनी केली.
