मुंबई : नीट पेपरफुटीविरोधात नवी दिल्लीत जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदाेलकांची मागणी योग्य असल्याचे सांगताना एखाद्या व्यक्तीकडून एखादे काम नीट होत नसेल आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य बरबाद होत असेल तर त्या व्यक्तीला बदलण्यात सरकारला कमीपणा का वाटतो, असा सवाल त्यांनी केला.
नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन तिथे एखाद्या सक्षम व्यक्तीची नियुक्ती करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केली. देशभरातील विरोधी पक्षांनी, सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी केले.
सोनम वांगचूक यांच्या बुद्धीमत्तेचा देशासाठी फायदा करून घ्यायला पाहिजे. असे असताना आपल्या देशात अशा व्यक्तीला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले जाते. त्यांची तब्बेत खालावत चालली आहे. चार दिवसांपूर्वी मी फोनवरून त्यांना विनंती केली होती की तुमच्यासारख्या व्यक्ती देशाला हव्या आहेत. सरकारला काही पडलेले नाही. तुमच्यासारख्या व्यक्ती एक एक करून जात असतील तर सरकारला ते हवेच आहे, असे सांगत २०१८ साली जे.डी. अगरवाल यांनी गंगेसाठी उपोषण केले होते. त्यासाठी त्यांनी प्राण सोडले. पण त्यांची कुणी दखल घेतली नाही. आज वांगचुक यांचीही तीच अवस्था सरकार करत आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधताना ‘पालकांनी आयुष्याची पुंजी लावून मुलांना शिकवले, पण एका पेपरफुटीमुळे सर्व बरबाद झाले. पेपरफुटीचे सर्वाधिक धागेदोरे आणि अटका महाराष्ट्रात झाल्या आहेत. तरीही सरकारला याची चिंता नाही. ते परदेशात फिरण्यात आणि भाडोत्री लोक आणून स्वतःचे स्वागत करून घेण्यात मग्न आहेत, असा टोलाही ठाकरेंनी पंतप्रधानांना लगावला. दरम्यान, जंतरमंतरवर आंदोलनात गुंड घुसवून हिंसाचार माजवून हे आंदोलन उधळून लावण्याचा काही जणांचा डाव आह, या अभिजित दीपकेच्या दाव्यावरून संतपा व्यक्त करत हे अत्यंत नीच आणि हिणकस वृत्तीचे लक्षण असल्याचे ते म्हणाले.
माणुसकी शिल्लक असेल तर समर्थन द्या!
संसदेच्या २० जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनातही सर्वपक्षीय खासदारांनी हा मुद्दा उचलून धरण्याचे आवाहन त्यांनी केले. संसदेचे अधिवेशन २० तारखेला सुरू होत आहे. आमचे खासदार हा प्रश्न संसदेत उचलतीलच. पण मी सर्व पक्षांच्या, अगदी भाजपच्या खासदारांनाही आणि राज्यसभेतील सदस्यांना उद्देशून सांगतो की, जर तुमच्यात थोडीशी तरी माणुसकी शिल्लक असेल तर या आंदोलनाला समर्थन द्या. हा देशाच्या युवकांचा प्रश्न आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनीही त्या व्यासपीठावर जावे. आपणही तिथे जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
१८ तारखेला नागपुरात रामरक्षा पठण
दादर येथे झालेल्या ‘महाआरती’चा संदर्भ देत हिंदुत्वाचा दुरुपयोग करून जो लुटीचा कार्यक्रम सुरू आहे, त्याविरोधात आम्ही दादरला आंदोलन केले. येत्या १८ तारखेला नागपुरात हा कार्यक्रम होईल आणि आपण स्वतः तिथे जाणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदूंनी आता झोपून चालणार नाही, कोणी आपल्याला लुटत असेल तर जागे झाले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
