मुंबई : ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत गेलेले चालतात. लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर माथे टेकवले किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफांच्या वाढदिवसाला जाऊन केक कापला, त्यात भाजपला काही वावगे वाटत नाही. पण, आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली तर हिंदूत्व सोडले, अशी आवई उठवली जाते. याच न्यायाने भागवत मशिदीत गेले म्हणजे भाजप-संघ परिवाराने  हिंदूत्व सोडले असे मानायचे का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला. हिंदूत्वाबाबत तडजोड नसल्याचे स्पष्ट करत ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला लक्ष्य केले.

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. ‘‘काँग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून आम्ही हिंदूत्व सोडले, अशी टीका भाजपकडून केली जाते. पण, शिवसेनेने कधीही हिंदूत्व सोडलेले नाही, याचा पुनरुच्चार करताना ठाकरे यांनी भाजपच्या हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘आमचे हिंदूत्व देशाशी जोडलेले आहे, तुमचे हिंदूत्व हे शेंडी- जानव्याशी जोडलेले आहे. नुसती जपमाळ करून कोणी हिंदू होत नाही. भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. त्यावेळी हिंदूत्व कुठे गेले होते, असा सवाल करीत देशप्रेमी मुस्लीम किंवा अन्य धर्मीय हे आमच्यासाठी हिंदूच आहेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यात फडणवीस सरकार असताना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव केले नव्हते. ते आमच्या सरकारने केले आणि त्यावेळी शिवसेनेच्या प्रस्तावास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तात्काळ पाठिंबा दिला होता, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

भागवतांवर टीका, तर होसबाळे यांचे कौतुक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे संवाद साधण्यासाठी मशिदीत गेले होते, असे सांगण्यात येते. भागवत हे राष्ट्रपिता असल्याचे मत उपस्थित मुस्लिमांनी केले. आम्ही तर भागवत यांना राष्ट्रपती करा, अशी आधीच मागणी केली होती. भागवत यांनी नागपूरच्या मेळाव्यात महिला-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणाचा उल्लेख केला. पण, गुजरातमध्ये बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींची सुटका झाल्यावर त्यांचा  सत्कार करण्यात आला आणि उत्तराखंडमध्ये भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये एका तरुणीची हत्या होते, हीच का भाजपची महिला शक्ती का, असा खोचक सवालही ठाकरे यांनी केला. बेरोजगारी, विषमता यावरून रा. स्व. संघाचे दत्तात्रय होसबाळे यांनी केलेल्या विधानांबाबत त्यांचे अभिनंदनच करावे लागेल. होसबाळे सत्यच बोलले. त्यांनी मोदी आणि भाजप सरकारला आरसा दाखवला आहे. होसबाळे यांच्या विधानानंतर काही तरी सुधारणा होईल ही अपेक्षा आहे, असेही ठाकरे म्हणाले. महागाईत सामान्य जनता होरपळली असताना भाजप नेते मुद्दाम गाईचा विषय सारखा-सारखा उकरून काढतात, असा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस यांच्यावरही टीका

कायदा पाळून भाषण न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याचा त्यावर ठाकरे म्हणाले, कायदा आम्हालाही कळतो. एक आमदार मिरवणुकीत गोळीबार करतो, दुसरा हातपाय तोडण्याची भाषा करतो. नवी मुंबईत पोलीस अधिकारी शिवसेना कार्यकर्त्यांना धमक्या देतात, अन्य काही ठिकाणीही तडीपारी व अन्य प्रकार सुरू आहेत.  ‘मिंधें’साठी कायदा नाही का?  आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरे पाळणार का? कायद्याचा एकतर्फी वापर आणि अन्याय सहन करणार नाही. मी सांगितल्याने शिवसेना कार्यकर्ते आज शांत आहेत, त्यांना भडकण्यास भाग पाडू नका. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. मी पुन्हा येईन म्हणाले होते. परत आले, पण दीड दिवसात पदावरून गेले. शेवटी ते उपमुख्यमंत्री झाले, अशी बोचरी टीका ठाकरे यांनी केली.

खोकासूर भस्मसात

आता शिवसेनेचा वणवा पेटेल आणि त्यात गद्दारीचा रावण, खोकासूर भस्मसात होईल, असा हल्लाही त्यांनी चढविला. ज्यांना आमदार, खासदार, मंत्री केले, त्यांनी गद्दारी केली. पण ज्यांना काही दिले नाही, ते एकनिष्ठ आज माझ्याबरोबर आहेत, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. यांची हाव संपतच नाही, त्यामुळे शिवसेना काबीज करून धनुष्यबाण चिन्ह हवे आहे, पक्षप्रमुख व्हायचे आहे. एकनिष्ठ शिवसेना कार्यकर्त्यांने सांगितले, तर मी पक्षप्रमुखपद लगेच सोडेन, पण गद्दारांनी सांगून कदापिही नाही. बांडगुळे छाटली गेली, हे बरेच झाले. वृक्षांची मुळे जमिनीत असतात, बांडगुळांना स्वत: ची ओळख नसते. स्वत:च्या वडिलांच्या नावाने मते मागता येत नाहीत, त्यामुळे बाप चोरणारी ही औलाद आहे. मी रुग्णालयात निपचीत पडून असताना पुन्हा उठू नये, यासाठी गद्दारांची कटकारस्थाने सुरू होती, असा आरोपही ठाकरे यांनी केला.

 अडीच वर्षे सरकार चालवताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगली साथ दिली व मानसन्मान दिला. उलट भाजपच्या सरकारमध्ये असताना ते ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना जाऊन भेटले होते, हे चव्हाण यांनी नुकतेच उघड केले आहे. तसेच मी बोलत असताना अजितदादांनी कधी लुडबूड केली नाही, असा टोलाही ठाकरे यांनी शिंदे यांना लगावला.

ईडीचे कार्यालय दिसताच गद्दारांचे हिंदूत्व घुमू लागते व त्यासाठी शिवसेना सोडल्याचे ते सांगत आहेत. धर्मवीर आनंद दिघे हे एकनिष्ठ शिवसेना नेते होते. त्यांची आठवण शिंदे यांना २० वर्षांत झाली नाही. आता त्यांचे नाव राजकारण करण्यासाठी घेतले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

हुकूमशाहीचा धोका 

देशात कोणतेही पक्ष शिल्लक राहणार नाहीत, शिवसेना संपली आहे, अशी वक्तव्ये भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहेत. देशात हुकूमशाही येण्याचा धोका असून, त्याविरोधात एकजूट दाखविण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

अमित शहा घरगुती मंत्री

अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे ‘घरगुती मंत्री’ आहेत, असा सवाल ठाकरे यांनी केला. ते वेगवेगळय़ा राज्यात जाऊन सरकारे पाडत आहेत, पक्ष फोडत आहेत. शिवसेनेला जमीन दाखवा, असे सांगत आहेत. त्यांनी गद्दारांच्या पालखीतून मिरविण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरची एक इंचभरही जमीन मिळवून दाखवावी, आम्ही त्यांचे कौतुक करू, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.

‘दिवाळी भेट निविदेची चौकशी करा’ राज्य सरकारने दिवाळीनिमित्त तेल, साखर, मैदा शिधापत्रिकाधारकांना देण्यासाठी ५१३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत एक ऑक्टोबरला निविदा काढली, दुसऱ्या दिवशी सुटी आणि तीन तारखेला निविदा मंजूर केली. हे संशयास्पद असून या निविदांची चौकशी करावी व कंत्राट रद्द करावे. शिधापत्रिकाधारकांना थेट खात्यात रक्कम जमा करावी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

‘पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री’

शिवसेनेतील बंड हे तोतयांचे बंड असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. बंडखोर अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसैनिकांची अशीच साथ लाभली तर भविष्यात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.