मुंबई: कारणे सांगू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा करा. याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी वाढ करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी विभागीय आयुक्तांनी दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी टंचाईवरून लोकांमध्ये नाराजी असून राजकीय पक्षांकडूनही आंदोलने केली जात आहेत. गेल्याच आठवडय़ात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न शिवसेनेला त्रासदायक ठरू लागला आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल उपस्थित होते तर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आदी सहभागी झाले होते. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी रेंगाळणार नाही, याची दक्षता सरकारने घेतली आहे. शहराच्या पारोळय़ापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी मिळविण्यासाठी वन विभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.  

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray tells district admin to resolve water supply issue in aurangabad city zws
First published on: 03-06-2022 at 01:05 IST