गेल्या ५० वर्षांत शिवसेनेची राज्यात एकहाती सत्ता आली नसली, तरी यापुढे एकहाती सत्ता आणून दाखवेन, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईमध्ये व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती तोडण्याची आमची इच्छा नाही. पण लाचार होऊन वेडीवाकडी युती करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते आणि मंत्री उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुकीवेळी युती होईल की नाही आम्हाला माहिती नाही. आम्ही हिंदुत्त्वासाठी युती केली होती. महापालिकेतील युती तोडण्याची आमची इच्छाही नाही. पण लाचार होऊन वेडीवाकडी युती कधीही सहन करणार नाही. स्वबळावर निवडणूक जिंकण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे, असेही सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
शिवसेना रिजनल पार्टी असली, तरी ओरिजनल पार्टी आहे. इतरांमधून फुटून आम्ही आमची पार्टी काढली नाही. एक विचार घेऊन या पक्षाची स्थापना झाल्याचे सांगून ते म्हणाले, स्वतःला सिंह म्हणवून घेणारे ९२ च्या दंगलींवेळी कुठे होते. त्यावेळी आम्ही नसतो तर मुंबईचं काय झालं असतं. उगाच कोणी कोणाचा आव आणायचा प्रयत्न करू नये, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यामागची भूमिका मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षांनंतर राज्यात सत्तांतर घडले होते. सत्तांतर झाल्यावर अपशकुन करणे योग्य वाटले नाही. म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आम्हाला कोणती खाती मिळताहेत याचा विचार आम्ही केला नाही. पण आता सत्तेत आल्यावर आमची जबाबदारी वाढली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आमचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.