यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, यावरून आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. आज ष्णमुखानंद सभागृहात शिवसेनेच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केलं.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “भाजपा आणि मिंध्यांना माझं आव्हान आहे, षंढ नसाल तर…”

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“या निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं आहे. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला. तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपावर केली टीका

पुढे बोलताना त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं. “पक्ष फोडायचे, सरकार पाडायचं, फोडलेल्या लोकांना मंत्रिपदं द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे. आज मी मिंधे आणि भाजपाला आव्हान देतोय जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं चिन्ह न चोरता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून फिरा, विजेते म्हणून फिरु नका. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा – “बऱ्याच वर्षांपासून गृहखातं असल्याने, त्यांचा अन्…”; फडणवीसांच नाव न घेता भास्कर जाधव…

पंतप्रधान मोदींना दिलं आव्हान

“मोदींना मी आमंत्रण देतोय, विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरु करा. मी आहे आणि तुम्ही आहात. नाव चोरायचं नाही, वडील चोरायचे नाहीत, पक्ष चोरायचा नाही, धनुष्यबाण बाजूला ठेवा आणि नवी निशाणी घ्या. मिंध्यांच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर. माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता? षंढ कुठले” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.