मुंबई : गुजरातमधील सुरत आणि परिसरात रोजगार, व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील हजारो नागरिकांना सणासुदीला गावी परतताना रेल्वे स्थानकांवरील गर्दीचा सामना करावा लागतो. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने उधना स्थानकावर ४० कोटी रुपये खर्चून स्वतंत्र प्रवासी सुविधा केंद्र उभारले आहे. एकाच वेळी २५ ते ३० हजार प्रवाशांची क्षमता असलेल्या या केंद्रामुळे महाराष्ट्रासह उत्तर, दक्षिण आणि ईशान्य भारतात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.

दिवाळी आणि छठपूजेच्या काळात गुजरातमधील रेल्वे स्थानकांवर उसळणारी प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने उधना स्थानकावर स्वतंत्र प्रवासी सुविधा केंद्र सुरू केले आहे. तसेच हिवाळी आणि उन्हाळी हंगामामधील गर्दी विभाजित करता येणार आहे. गाड्यांच्या वेळेनुसार प्रवाशांना टप्प्याटप्प्याने फलाटावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन होईल.

फलाटांवरील गर्दीचे नियोजन

प्रवाशांना थेट फलाटावर जाण्याऐवजी स्वतंत्र केंद्रात थांबवून गाडीच्या वेळेनुसार टप्प्याटप्प्याने फलाटावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे गाडी येण्यापूर्वी फलाटांवर होणारी गर्दी नियंत्रित करणे शक्य होणार आहे. केंद्रात १० हजार चौमी.चा आच्छादित प्रतीक्षा परिसर, दोन हजार चौरस मीटरचा प्रवेश प्लाझा आणि तीन हजार चौरस मीटरचा मोकळा मार्ग तयार करण्यात आला आहे. अर्धा किमी लांब आणि ३६ मीटर रुंद परिसरात मिनी रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर हे केंद्र विकसित करण्यात आले आहे. दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची ये-जा हाताळण्याची क्षमता या केंद्रात आहे. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी रात्री ३० हजारांहून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा वापर केला.

महाराष्ट्रातील प्रवाशांना फायदा

सुरत आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रांत महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या संख्येने रोजगार आणि व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. दिवाळी, छठपूजा आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात हे प्रवासी महाराष्ट्रात येतात. त्यावेळी उधना स्थानकावर मोठी गर्दी होते. विरार शटल सेवा, भुसावळ एक्स्प्रेस, अमरावती विशेष आणि नंदुरबार एक्स्प्रेस यासारख्या गाड्यांमधून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. गर्दीच्या काळात विशेष गाड्याही चालवल्या जातात. त्यामुळे नव्या केंद्राचा लाभ महाराष्ट्रातील प्रवाशांनाही होणार आहे.

दिवाळी, छठपूजा आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये उधना स्थानकावर प्रवाशांची संख्या दरवर्षी २० ते ३० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे उधना स्थानकाचा पर्यायी स्थानक म्हणून विकास करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेतील हे सर्वात मोठे विशेष प्रवासी प्रतीक्षा केंद्र (होल्डिंग एरिया) असून, येथे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. फलाटांवर गर्दी होऊ नये आणि गाडीची प्रतीक्षा करताना प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी वातावरणात सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हे स्वतंत्र प्रवासी सुविधा केंद्र उभारले आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.