मुंबई : आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी), युगांडा आणि दक्षिण सुदान येथे इबोला रोगाचा उद्रेक झाल्यानंतर आफ्रिकी देशातून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. युगांडामधून नागपूर विमानतळावर नुकतीच ४७ वर्षीय व्यक्ती उतरली असून नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशाला पुढील २१ दिवस गृह विलगीकरणात राहण्याचे आदेश दिले आहेत.
युगांडामधून आलेल्या या व्यक्तीमध्ये इबोला संसर्गाची कोणतीही प्राथमिक किंवा गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य पथक दररोज या प्रवाशाच्या प्रकृतीची प्रत्यक्ष तपासणी करीत आहे. या व्यक्तीमध्ये २१ दिवसांच्या आत इबोलाची काही लक्षणे आढळली, तर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क
आफ्रिकेमध्ये इबोला रोगाच्या उद्रेकानंतर जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली असून भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील आरोग्य विभागांकडून इबोला सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. ताप, अशक्तपणा, स्नायू दुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे, उलट्या, जुलाब, पोटदुखी, अंगावर पुरळ आणि डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसणाऱ्या तसेच अलीकडे प्रभावित देशांतून प्रवास करून आलेल्या व्यक्तींवर विशेष नजर ठेवण्यासाठी एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत देखरेख ठेवण्यावर भर देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा स्तरावरील ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ सज्ज
संशयित प्रवाशांची माहिती तत्काळ मिळावी यासाठी विमानतळ आणि बंदरांवरील आरोग्य यंत्रणांशी राज्य व जिल्हा पातळीवरील सर्वेक्षण विभागांमार्फत समन्वय ठेवण्यात येत आहे. इबोला संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आयसीएमआरअंतर्गत कार्यरत असलेली पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे.
राज्य आणि जिल्हा स्तरावरील ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ सतत सज्ज ठेवण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. आरोग्य विभाग, प्रयोगशाळा, जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणांमधील समन्वय मजबूत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संशयित रुग्णांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध
संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष, विशेष रुग्णवाहिका, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, पुरेसे पीपीई किट, प्रयोगशाळा सुविधा आणि अतिदक्षता उपचार व्यवस्था उपलब्ध ठेवण्याचे आदेश सर्व वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि जिल्ह्यांना दिले आहेत.
प्रतिबंधात्मक तयारी बळकट करण्यावर भर
देशात सध्या इबोलाचा कोणताही रुग्ण आढळलेला नसला तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक तयारी बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच नागरिकांमध्ये भीती किंवा अफवा पसरू नयेत यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे सर्व जिल्ह्यांना निर्देश दिले असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
