मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात यूजीसी नेटची पुनर्परीक्षा ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) ४ सप्टेंबर रोजी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना त्यांच्या लॉग-इनद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेचे शहर आणि तारीख याबाबतची माहिती यापूर्वीच १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘शहराची आगाऊ माहिती देणाऱ्या चिठ्ठी’द्वारे उमेदवारांना देण्यात आली आहे.
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://ugcnet.nta.nic.in/ वर जाऊन आपल्या लॉग-इन तपशीलाच्या आधारे प्रवेशपत्रासोबतचे हमीपत्र डाऊनलोड करावे आणि त्यावरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे, असे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करताना अडचण आल्यास किंवा प्रवेशपत्रावरील तपशीलात काही तफावत आढळल्यास उमेदवारांनी एनटीए हेल्पडेस्कशी ०११-४०७५९००० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ugcnet@nta.ac.in या ई-मेलवर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भातील पुढील माहितीसाठी उमेदवारांनी https://ugcnet.nta.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहनही एनटीएने केले आहे.
