मुंबई : सध्या जगभर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा सुरु असून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र, ऑलिम्पिक संपायला अवघे पाच दिवस उरलेले असताना भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी देशातील सर्व महाविद्यालयांच्या आवारात विविध उपक्रम राबविण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक यूजीसीने मंगळवारी (६ ऑगस्ट) काढले आहे. ऑलिम्पिक स्पर्धा ११ ऑगस्टपर्यंत आहेत. आता अवघे पाच दिवस राहिलेले असताना उपक्रम राबवायचे आदेश आल्यामुळे महाविद्यालयांसमोर पेच निर्माण झाला आहे. या पाच दिवसांतही शनिवार व रविवारची सुट्टी आहे. यासंदर्भातील परिपत्रकही अनेक महाविद्यालयांपर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे बहुसंख्य महाविद्यालये याबाबत अनभिज्ञ आहेत. हेही वाचा : मुंबई: १६ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, गुन्हे शाखेच्या दत्ता नलावडे यांची रेल्वे उपायुक्तपदी बदली भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये विविध १६ खेळप्रकारांमध्ये ११७ खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महाविद्यालयाच्या आवारात विविध उपक्रम राबविण्याचे आदेश यूजीसीने देशातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांना दिले आहेत. या संपूर्ण उपक्रमाबाबत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा विभागाने २० जुलै रोजी पत्राद्वारे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर २४ जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला कळविले. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धा संपायला अवघे ५ दिवस उरलेले असताना यूजीसीने देशातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांना विविध उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचा : Ganeshotsav 2024 Google Maps: यंदा गणेशोत्सवातील कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर ! महाविद्यालयांमध्ये सेल्फी पॉईंट व स्टँडीज उभ्या करणे, विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रे व प्रश्नमंजुषा, वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धा आयोजित करणे. क्रीडा विकास, क्रीडा विज्ञान, विद्यापीठांचा विविध खेळप्रकारांमध्ये सहभाग आदी विविध क्रीडा क्षेत्रासंबंधित विषयांवर परिषदा आयोजित करणे, मंत्रालय आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांच्या विविध माध्यमांद्वारे समाजमाध्यमांवरही जनजागृती करणे असे उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या उपक्रमांची आखणी करणार कधी? सेल्फी पॉईंट व स्टँडीज कधी तयार करणार? आदी विविध प्रश्न शिक्षणसंस्थांना पडले आहेत.