मुंबई : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती व फेलोशिपच्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यासाठी आधार-आधारित पेमेंट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा होणार आहे. हा निर्णय २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
देशातील लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कम ही फक्त आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयोगाच्या विविध योजनांअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती व फेलोशिपची रक्कम
आता केवळ आधार-आधारित बँक खात्यांमध्येच जमा करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया शिष्यवृत्ती आणि फेलोशिप व्यवस्थापन प्रणालीमार्फत (स्कॉलरशिप ॲण्ड फेलोशिप मॅनेजमेंट पोर्टल – एसएफएमपी) राबवली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर ही माहिती एसएफएमपी प्रणालीवर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया १५ एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आले आहेत.
शैक्षणिक संस्थांमधील नोडल अधिकाऱ्यांना देखील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आधार आधारित बँक खात्याची पडताळणी करून त्यास मंजुरी देणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया २० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. जेणेकरून २०२६-२७ या आर्थिक वर्षात शिष्यवृत्तीचे वेळेत वितरण करणे शक्य होईल, असे यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले.
पारदर्शकता व गती वाढवण्यावर भर
आधार-आधारित पेमेंट प्रणालीमुळे निधी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असून, मध्यस्थांची गरज कमी होईल. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसून प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित होईल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे. याशिवाय, आधार अद्ययावत करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन एसएफएमपी पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहे. कोणत्याही अडचणीसाठी netjrf-uge@nic.in या ई-मेलवर संपर्क साधण्याची सुविधा आयोगाकडून उपलब्ध करण्यात आली आहे.
