मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाने उजनी जलाशय परिसरात चालणाऱ्या बेकायदा आफ्रिकन मंगूर मासे शेतीविरोधात मोठी कारवाई करून २.४ टन मासे जप्त केले. राज्यात मंगूर मासे पालनावर कायदेशीररित्या बंदी असूनही सुरू असणाऱ्या शेतीमुळे उजनीच्या जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होत असल्याची भिती व्यक्त केली आहे.
आफ्रिकन मंगूर हा एक आक्रमक जातीचा शिकारी मासा असून १९९७ च्या केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार देशातील अंतर्गत जलस्रोतांमध्ये त्याच्या पालनावर बंदी घातली आहे. या प्रजातीमुळे स्थानिक मासे, जलस्रोत, उजनीसारख्या महत्त्वाच्या अधिवासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. उजनी जलाशय हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएएचएस) २०१४ पासून ‘इम्पॉरंट बर्ड एरिया’ (इंडीज) म्हणून घोषित केलेले स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे.
दरम्यान, ही कारवाई असिस्टंट कमिशनर ऑफ फिशरीजच्या अर्चना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य विकास अधिकारी राठोड, तुषार वालुंज, दीपाली गुंड व गजानन काटे यांच्या संयुक्त मदतीने करण्यात आली. जप्त केलेल्या माशांची प्रजाती तपासण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वैज्ञानिकांना पाचारण करण्यात आले होतज. प्रजातीची खात्री करून झाल्यानंतर संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला.
बीएनएचएसचे डॉ. उन्मेष काटवटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आफ्रिकन मंगूर मासा असल्याची वैज्ञानिक पुष्टी केली. तसेच त्यांनी शेतीत वापरलेल्या पाण्याचे नमुनेही संकलित केले असून त्यावरून पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले जाणार आहे. जप्त केलेल्या माशांमध्ये मायक्रोप्लास्टिक किंवा जड धातूंची उपस्थिती आहे का याचाही तपास करत असल्याचे, डॉ. काटवटे यांनी सांगितले.
दरम्यान, मत्स्य व्यवसायिकांना विभागाकडून योग्य व कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी बेकायदेशीर मंगूर शेती थांबवावी, असे आवाहन अर्चना शिंदे यांनी केले आहे. तसेच विभागाकडून अशा कारवाया पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
