मुंबई : ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली. उल्हान नदीला बुधवारी आलेल्या पुराने मध्य रेल्वेची वाट अडवली होती. नेरळ – भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा दिवसभरात दोन वेळा बंद ठेवावी लागली होती. परिणामी, बदलापूर – कर्जत लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे कर्जत, नेरळ, भिवपुरी रोड आणि बदलापूर भागांतील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
गेल्या चार दिवसांपासून मुंबई महानगरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. परंतु, महानगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने बुधवारी उल्हास नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे पहाटे ५.२७ वाजता नेरळ – भिवपुरी रोडदरम्यान रुळांवर पाणी साचले. खबरदारीचा उपाय म्हणून लोकल सेवा तातडीने बंद करण्यात आली. नेरळहून पहाटे ५.४० ची एक लोकल मुंबईच्या दिशेने निघाली होती. वाहतूक विस्कळीत झाल्याने काही धिम्या गतीच्या लोकल जलदगतीने चालवण्यात येत होत्या. त्याचा परिणाम मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवेवर झाला. अनेक लोकल रद्द झाल्याने प्रवासी हैराण झाले. बदलापूर – कर्जत लोकल सेवा
विस्कळीत झाल्याने, नोकरदारांनी घरची वाट धरली. परंतु, पाण्याची पातळी ओसरल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी रुळांची पाहणी करून सकाळी ६.१० वाजता दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्ववत केली. मात्र, काही तासांतच उल्हास नदीचे पाणी पुन्हा रुळावर आल्याने सकाळी १०.४० वाजता दुसऱ्यांदा लोकल सेवा बंद करण्यात आली. सुमारे ५२ मिनिटांनी पाणी ओसरल्यानंतर आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण करून सकाळी ११.३२ वाजता रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याहूनन मुंबईला येणाऱ्या रखडलेल्या रेल्वेगाड्या मार्गस्थ करण्यात आल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. तसेच कल्याण हे मोठे जंक्शन असून येथून कर्जत, कसारा आणि सीएसएमटी दिशेकडील लोकल ये-जा करतात. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या या स्थानकातून जातात. परंतु, उशिराने धावणाऱ्या रेल्वेगाड्यामुळे लोकल सेवा बराच वेळ एकाच ठिकाणी खोळंबल्या होत्या. सुरुवातीला १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणाऱ्या लोकल तब्बल एक ते दीड तास उशिराने धावू लागल्या. बदलापूर – कल्याणपर्यंतचा लोकल प्रवास रखडला होता.
कसारा आणि कर्जत येथून लोकल अवेळी येत असल्याने, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर या स्थानकांत प्रवासी लोकलची वाट पाहत होते. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि उल्हास नदीची पाणीपातळी पुन्हा वाढल्यास या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार तातडीने निर्णय घेत असल्याचेही मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
