उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का; ओमी कलानी गटाच्या २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मंगळवारी मध्यरात्री जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी याची भेट घेतली होती

Ulhasnagar 22 corporators of Omi Kalani group join NCP

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगर शहरात आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ‘कलानी महल’ येथे पप्पू कलानी याची भेट घेतल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले उल्हासनगर पालिकेतील २२ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याआधी कलानी यांची सून पंचम कलानी यांनी भाजपा नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे कलानी कुटुंबात कुणीही नव्हते. त्यामुळे भाजपापासून दुरावलेल्या ओमी कलानी आणि पूर्वाश्रमीच्या पप्पू कलानीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचे दिसत होते. पंधरा दिवसांपूर्वी भाजपाचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी पप्पू कलानीने चर्चा केली होती. याच वेळी आयलानी यांनी भाजपा प्रवेशाचे आमंत्रण दिले होते.

त्यानंतर आता भाजपाला कलानी गटाने मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीनंतर ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे एकूण ४० नगरसेवक असून त्यापैकी ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी मधील प्रवेशानंतर त्यांच्यावर कोणतीही अपात्रतेची कारवाई देखील होणार नसून भाजपला या नगरसेवकांना व्हिप देखील जारी करता येणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उल्हासनगर शहरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले कलानी कुटुंबीय यांचे घनिष्ठ संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या ज्योती कलानी यांना अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच उमेदवारी दिली होती. काही दिवसांपूर्वी ज्योती कलानी यांचे निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलानी कुटुंबात सध्याच्या घडीला कुणीही नव्हते. मात्र आता उल्हासनगर पालिकेतील कलानी गटाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने चित्र बदलण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ulhasnagar 22 corporators of omi kalani group join ncp abn

ताज्या बातम्या