मुंबई : दिल्लीच्या प्रख्यात स्त्रीवादी इतिहासकार डॉ. उमा चक्रवर्ती यांचे सांताक्रुज येथील एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये नियोजित व्याख्याने कारण न देता अचानक विद्यापीठ प्रशासनाने रद्द केले. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचे मुंबई विद्यापीठामधील कथावाचन आणि काळा घोडा महोत्सवातील दलित विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांची मुलाखत मागच्या महिन्यात आयोजकांना याच पद्धतीने रद्द करावी लागली होती.

एसएनडीटी महिला विद्यापीठाचे स्त्री अभ्यास संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद गेली अनेक वर्षे डॉ. मीरा देसाई स्मृती व्याख्यानाचे आयोजन करत आहे. या वर्षीचे स्मृती व्याख्यान १४ मार्च रोजी डॉ. उमा चक्रवर्ती यांचे होणार होते. ४० वर्षातील स्त्रीवादी इतिहासलेखन असा चक्रवर्ती यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाची माहिती समाज माध्यमावर प्रसिद्ध होताच त्याविरोधात विशिष्ट विचारसरणीच्या संघटनांनी मोहीम उघडली होती. प्रा. उज्वला चक्रदेव या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु आहेत.

स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका पुतूल साठे यांनी व्याख्यान रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेला कळवले आहे. यासंदर्भात कार्यक्रमाच्या समन्वयक कुंदा प्र. नि. म्हणाल्या की, डॉ. उमा चक्रवर्ती यांनी ‘ब्राह्मणवादी पितृसत्ताक’ ही संकल्पना पुढे आणली आहे. त्या स्त्रीवादी इतिहासकार आहेत. अकादमिक क्षेत्रातील विभिन्न दृष्टीकोण विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक असते. एका महिला विद्यापीठाने स्त्रीवादी इतिहासावरचे व्याख्यान कोणाच्या तरी दबावाखाली येऊन रद्द करणे धक्कादायक आहे.

कोण आहेत चक्रवर्ती ?

उमा चक्रवर्ती या स्त्रीवादी इतिहासकार आहेत. चक्रवर्ती यांनी लिंग, जात आणि वर्गाशी संबंधित मुद्द्यांवर प्रकाश टाकणाऱ्या भारतीय इतिहासावर विस्तृत लेखन केले आहे. दिल्ली विद्यापीठात त्या प्राध्यापक होत्या. इतिहासाचे लिंगभाव परिप्रेक्ष्यातून चिकीत्सा करणारे सात ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

फेब्रुवारीत दोन घटना :

१. मुंबईतील प्रसिद्ध काळा घोडा कला महोत्सवात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दलित विचारवंत व मानवी हक्क कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या पुस्तकावरील चर्चासत्र मुंबई पोलिसांनी आक्षेप घेतल्याने ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. ‘ कारावास: टेल्स फ्रॉम बिहाइंड बार्स, असे त्या कार्यक्रमाचे नाव होते. प्रा. तेलतुंबडे हे भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील गुन्ह्यामध्ये ३१ महिने तुरुंगात होते. त्यावर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे.

२. मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाने फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेला अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा जश्न-ए-उर्दू हा कविता आणि कथा वाचनाचा कार्यक्रम अचानक रद्द केला होता. मुंबई विद्यापीठाने आधी या कार्यक्रमासाठी शाह यांना आमंत्रित केले आणि नंतर ऐनवेळी कार्यक्रमास येऊ नका, असा निरोप धाडल होता.