मुंबई : उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राशी संपर्क वाढविण्यासाठी मुंबई भाजपने नवी उद्योग आघाडी जाहीर केली आहे. आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली या आघाडीचे काम चालेल. उद्योग क्षेत्रातील समस्या सरकार आणि धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. हॉटेल सहारा स्टार येथे झालेल्या कार्यक्रमाला २५० हून अधिक उद्योगपती, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) प्रतिनिधी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक आणि व्यावसायिक उपस्थित होते.
उद्योग क्षेत्राशी संवाद, प्रशिक्षण आणि ज्ञानवाटप, उद्योजकता विकास तसेच उद्योगांसमोरील अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी पुढील १५ महिन्यांत १२ कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन उद्योग आघाडीने केले आहे. यामध्ये दिवाळी स्नेहमेळावा आणि ‘इंडस्ट्री अवॉर्ड्स नाईट’चाही समावेश आहे.
अमित साटम यांनी यावेळी भारतातील उद्योजकता आणि उद्योग क्षेत्रातील वाढीचा उल्लेख केला. २०१४ मध्ये सुमारे ४.७५ लाख असलेली एमएसएमईची संख्या २०२६ मध्ये ८.७५ कोटींवर पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. भारतातील स्टार्टअप आणि युनिकॉर्न क्षेत्रातील वाढीचाही त्यांनी उल्लेख केला.
उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा मजबूत करणे, व्यावसायिकांच्या समस्या मांडणे, उद्योगांसमोरील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना सुचविणे आणि व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी सूचना देणे, ही आघाडीची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे संयोजक भारत अजवाणी यांनी सांगितले. या आघाडीत भारत अजवाणी (संयोजक), सपन कडाकिया (सहसंयोजक), निखिल भंडारी आणि रविन पुंजवानी (उपाध्यक्ष), रोशन चौधरी आणि तरुण बत्रा (सचिव), कमलेश दवे (कोषाध्यक्ष), अतुल मिस्त्री (सहसचिव), कुणाल राजानी (इव्हेंट्स) आणि कीर्ती अडेकर (सचिव) यांचा समावेश आहे.
