लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अतिब रशीद याने दोषमुक्तीच्या मागणीसाठी केलेला अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला.

खटला चालविण्यासाठी आतिबविरोधात पुरेसे सकृतदर्शनी पुरावे उपलब्ध असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांनी त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावताना नमूद केले.

कोल्हे यांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर एक पोस्ट केली होती. त्या पार्श्वभूमीवर जून २०२२ मध्ये त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणात ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी एकाच उद्देशाने काम करत असल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. कोल्हे यांची हत्या करून विशिष्ट समाजामध्ये दहशत निर्माण करणे मुख्य उद्देश असल्याचे सकृतदर्शनी निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हत्या करण्याच्या कटाचे आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे पुरावे आरोपपत्रासोबत सादर करण्यात आले आहेत. आतिब आणि प्रत्यक्ष हल्लेखोरांमध्ये हत्येपूर्वी व हत्येनंतर शेकडो फोन कॉल झाल्याच्या कॉलच्या नोंदींतून स्पष्ट होते. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आतिबची उपस्थिती दिसून आली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

‘आरोपी प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असणे आवश्यक नाही’

हत्येनंतर आतिब याने सहआरोपीला संदेश पाठवल्याचेही तपासात समोर आले. मोबाइलमधील माहितीरुपी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर, आतिबने आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आणि त्याच्याविरोधात थेट पुरावा नसल्याचा दावा केला होता. तसेच तो कोणत्याही प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य नसल्याने यूएपीए लागू होऊ शकत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मात्र, बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याच्या (यूएपीए) कलम १५ अंतर्गत आरोपी प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. उपलब्ध पुरावे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे असल्याचेही नमूद करून न्यायालयाने आतिब याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला.