मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अनधिकृतपणे लोखंडी सांगाड्यावर भलेमोठे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. अत्यंत धोकादायक पद्धतीने जमिनीवर महाकाय जाहिरात फलक उभे केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेला न सांगताच हे फलक उभारण्यात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे असून हा महाकाय जाहिरात फलक व लोखंडाचा सांगाडा क्रेनच्या साहाय्याने हटवण्यात आला आहे.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात प्रवेशद्वार क्रमांक-५ च्या दोन्ही बाजूस महानगरपालिकेची परवानगी न घेता दोन ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावण्यात आले होते. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची भव्य प्रतिकृती या ठिकाणी लावण्यात आली होती. सुमारे २० बाय २० फूट आकाराच्या या फलकासाठी दोन्ही ठिकाणी लोखंडी संरचनादेखील उभारण्यात आली होती. केवळ जमिनीवर हे लोखंडी सांगाडे उभे होते. यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून संबंधित जाहिरातदार अभिषेक चव्हाण यांना दिनांक २९ जानेवारी २०२६ लेखी नोटीस बजावून अनधिकृत जाहिरात फलक आणि लोखंडी संरचना तत्काळ हटवण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र त्यांनी फलक आणि लोखंडी संरचना न हटवल्यामुळे त्यांच्याविरोधात दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३ व ४ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, सह कलम ३२८, ४७१ अन्वये ही कारवाई करण्यात आली. तसेच, ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागातील अनुज्ञापन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निष्कासनाची कारवाई करत फलक आणि लोखंडी संरचनेचे साहित्य जप्त केले.

दरम्यान, तेथे एका कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी हे जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे समजते. शिवाजी पार्क येथील रहिवाशांनी या प्रकरणी समाजमाध्यमांवर तक्रार केली होती. तसेच हे जाहिरात फलक धोकादायक असल्याचेही म्हटले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने ही कारवाई केली.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील यासंदर्भात जी उत्तर प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते म्हणाले की, जाहिरातदार तसेच संबंधितांनी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावून विद्रुपीकरण करु नयेत. अन्यथा, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नाही. तसेच, अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात निष्कासनाची कारवाई नियमितपणे सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.