अनधिकृत बांधकामांची डोंगरी

एकेकाळी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या दहशतीमुळे गाजलेली डोंगरी आता अनधिकृत बांधकामांमुळे ऐरणीवर आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)
एकेकाळी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या दहशतीमुळे गाजलेली डोंगरी आता अनधिकृत बांधकामांमुळे ऐरणीवर आली आहे. कुख्यात गुंड आणि अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची अभद्र युती डोंगरीमध्ये झाल्याने या इमारतींवर हातोडा चालविणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारीही धास्तावले आहेत.

डोंगरी आणि आसपासच्या परिसरात १०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. दाटीवाटीने उभ्या असलेल्या यापैकी बहुसंख्य दुमजली, तीनमजली इमारती आजघडीला धोकादायक बनल्या आहेत. एकतर या इमारतींची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती करण्याची वा पुनर्विकास करण्याची नितांत गरज आहे. मात्र याच गोष्टीचा फायदा घेऊन या भागातील इमारतींवर बिनदिक्कत अनधिकृतपणे इमले चढविण्याचे उद्योग तथाकथित विकासकांनी सुरू केले आहेत.

मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून परवानगी घेण्यात येते. दुरुस्ती करण्यात येणाऱ्या इमारतीचा मोडकळीस आलेला भाग पाडून तो पुन्हा जसाच्या तसा उभारणे अपेक्षित आहे. मात्र दुरुस्तीची परवानगी मिळाल्यानंतर चारही बाजूने कपडा वा पत्र्याच्या साह्य़ाने बंदिस्त करून इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात येते. कपडा वा पत्र्यामुळे आतमध्ये काय चालले आहे याचा पत्ताच लागत नाही. तीन-चार मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत बांधण्याचे आधीच निश्चित करण्यात आलेले असते. त्यासाठी लोखंडी खांबाच्या आधाराने १०-११ मजली इमारती उभारण्यात येत आहेत.

भातबाजार परिसरातील केशवजी नाईक मार्गावर अशीच एक ११ मजली इमारत उभारण्यात आली होती. ही बाब निदर्शनास येताच आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून ‘बी’ विभाग कार्यालयातील तत्कालीन साहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी ही इमारत जमीनदोस्त केली. ही इमारत जमीनदोस्त करण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर दबाव टाकण्यात येत होता. तसेच कामगारांना मारहाण करून पळवूनही लावण्याचे प्रकार घडले. मात्र पालिकेने ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त केली. त्यानंतर या परिसरात अशाच पद्धतीने उभारण्यात येत असलेल्या बहुमजली इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशाच पद्धतीने या भागात उभारलेल्या आणखी १० इमारतींची यादी त्यावेळी पालिकेने तयार केली होती. मात्र त्यापैकी काही इमारती तोडण्यात पालिका यशस्वी झाली. मात्र काही मालकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे या संबंधातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. तांडेल क्रॉसलेनमधील म्हाडाच्या इमारतीच्या पाठीमागे अनधिकृतपणे उभारलेली तीन मजली केसरबाई इमारत बुधवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्यानंतर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतींमुळे डोंगरी ऐरणीवर आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Unauthorized construction of dongri abn