मुंबई : पश्चिम दृतगती मार्गावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या बेकायदेशीरपणे तोडण्यात आल्याचा आरोप एका सामाजिक संस्थेने केला आहे. व्यावसायिक जाहिरात फलक व्यवस्थित दिसावेत म्हणून या झाडांच्या फांद्या वाट्टेल तशा छाटण्यात आल्याचा आरोप या संस्थेने केला असून या प्रकरणी मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

विलेपार्ले (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या अनेक निरोगी झाडांची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आल्याची तक्रार वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेने केली आहे. एका नागरिकाच्या तक्रारीवरून वॉचडॉग फाऊंडेशनने याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना तसेच राज्य सरकार आणि पर्यावरण विभाग यांच्याकडे तकार केली आहे. ही झाडे सुस्थितीत असतानाही केवळ मोठ्या व्यावसायिक जाहिरात फलकांची दृश्यमानता वाढवण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडल्याचा आरोप संस्थेने केला आहे.

झाडांची बेसुमार कत्तल असून ही वृक्षतोड कंत्राटदाराने वृक्ष प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने केल्याचा आरोपही संस्थेने केला आहे. ही वृक्षतोड केवळ व्यावसायिक फायद्यासाठी करण्यात आली असून त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोपही वॉचडॉग फाऊंडेशनने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी संबंधित जाहिरात फलक ठेकेदाराला त्वरित अटक करण्यात यावी. तसेच के पूर्व विभागातील वृक्ष विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. ठेकेदाराला दिलेले परवाने त्वरित रद्द करण्यात यावेत अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने केली आहे. दरम्यान, पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून पश्चिम दृतगती मार्गावरील अंधेरी ते विलेपार्ले परिसरातील झाडांची छाटणी ही पावसाळापूर्व छाटणीचा भाग होती. झाडांच्या फांद्या अवाढव्य वाढल्यामुळे झाडांचा समतोल बिघडतो व त्यामुळे झाड उन्मळून पडण्याचा धोका असतो. त्यामुळे जिवितहानीही होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही छाटणी करण्यात आली होती. पश्चिम दृतगती मार्गावर जाहिरात फलकासाठी झाडाच्या फांद्या वाट्टेल तशा कापण्याच्या घटना घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र वॉचडॉग फाऊंडेशनने तक्रार केलेल्या भागात पालिकेने छाटणी केली असल्याचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.