ऑनलाइन मंडप परवानगी अर्ज भरण्याबाबत मंडळे निरुत्साही

केवळ ६० मंडळांचे अर्ज सादर ; १६ जणांचे अर्ज फेटाळले

(संग्रहित छायाचित्र)

|| प्रसाद रावकर

केवळ ६० मंडळांचे अर्ज सादर ; १६ जणांचे अर्ज फेटाळले

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिका, स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस कार्यालयात खेटे घालावे लागू नयेत यासाठी पालिकेने मंडप परवानगीकरिता यंदा प्रथमच ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप परवानगीसाठी ऑनलाईनवर अर्ज करण्याच्या सुविधेकडे पाठ फिरविली आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये मुंबईतील केवळ ५० ते ६० मंडलांनीच मंडप परवानगीसाठी ऑनलाईनवर अर्ज केले आहे. तर कागदपत्रांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या १६ मंडळांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये तब्बल १० हजार ७०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी ३ हजार २०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे रस्त्यांवर मंडप उभारुन गणेशोत्सव साजरा करीत आहेत. गणेशोत्सवाकरिता रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी पालिका, स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्यानंतरच पालिकेकडून मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात येते.

रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. वाहतूक आणि पादचारी यांना अडथळा होत असलेल्या मंडपांना परवानगी देऊ नये असे सक्त आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. तसेच असे मंडप उभारण्यात आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे यंदा पालिकेने मंडप उभारणीबाबत कडक धोरण अवलंबले आहे.

यंदा पालिकेने प्रथमच मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पालिकेने २० जूनपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली असून मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट आहे. ऑनलाईन पद्धत कार्यान्वित करतानाच पालिकेने मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मंडळांना केले आहे.

मात्र मंडळांकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे उजेडात आले आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये मुंबईतील केवळ ५० ते ६० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पालिकेकडे ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. या अर्जाची पालिका अधिकाऱ्यांनी तातडीने छाननीही केली असून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या १६ मंडळांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. मात्र या मंडळांना पुन्हा अर्ज सादर करण्याची संधी मिळणार असून पुन्हा अर्ज सादर करताना आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज करावे लागणार आहेत.

मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबत पालिकेने मुख्य वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र सादर करायचे याचीही माहिती त्यात नमुद करण्यात आली आहे.    – नरेंद्र बर्डे, उपायुक्त, पालिका

ऑनलाईन पद्धतीबरोबरच पालिका कार्यालयात अर्ज सादर करण्याची मुभाही द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याचा पालिकेने फेरविचार करावा.     – अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्षबृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

 

‘मुंबईत विनापरवानगी एकही मंडप नको’

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सवासाठी मंडपविषयक परवानगी द्यावी. विनापरवानगी एकही मंडप उभा राहता कामा नये, असे सक्त आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी पालिका अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत दिली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप, प्रवेशद्वार, बाहेर जाण्याचा मार्ग याबाबत अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले आहे की नाही याची काटेकोरपणे खात्री करुन घ्यावी, असेही आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

गणेशोत्सवासाठी मंडप परवानगीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा मंडळांना यंदा प्रथमच उपलब्ध करण्यात आली असून मंडप, प्रवेशद्वाराबाबत मंडळांकडून करण्यात येणाऱ्या अर्जाची निर्धारित वेळेत छाननी करुन परवानगी द्यावी. अर्जामध्ये त्रुटी असल्यास तो फेटाळण्याचे कारण संबंधित मंडळाला कळवावे. एकही अर्ज प्रलंबित ठेऊ नये. आपापल्या हद्दीमध्ये विनापरवाना एकही मंडप उभा राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश अजोय मेहता यांनी दिले.

मंडळांना अर्ज करण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयात बोलवून त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावे. विभाग कार्यालयांमध्ये परवानगीसंबंधी काम करणाऱ्यांनी दैनंदिन कामकाजातील एक तास या कामासाठी राखून ठेवावा असे निर्देश त्यांनी दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Unauthorized mandap in mumbai

ताज्या बातम्या