मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृतरीत्या वाहने उभी केल्यामुळे अडथळे निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे यापुढे या अशा वाहनांमुळे आगीच्या किंवा आपत्तीस्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल हे मुंबईतील नागरिकांसह, प्राणी, पक्ष्यांचा जीव वाचविणे, आगीच्या दुर्घटना तसेच अन्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीपासून संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावत असते. अग्निशमन व विमोचन कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने, प्रगत साधनसामुग्री व कुशल मनुष्यबळ इत्यादींद्वारे शीघ्र प्रतिसाद देण्यासाठी घटनास्थळी धाव घेत असतात.

तथापि, मुंबईत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना विविध प्रकारची वाहने अनधिकृतरित्या उभी (पार्क) केलेली असतात. त्यामुळे प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यास किंवा पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांमुळे अग्निशमन व विमोचनाचे कार्य करताना अनेक अडचणी येतात. ते कार्य प्रभावीपणे राबविता न आल्याने भविष्यात जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येची महापालिका आयुक्त गगराणी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

आगीच्या किंवा आपत्तीच्या ठिकाणी जीवितहानी, वित्तहानी अथवा जखमींचे प्रमाण लक्षणीय असेल आणि अनधिकृतरित्या उभ्या केलेल्या वाहनांमुळे अग्निशमन व विमोचन कार्यात विलंब झाल्याचे आढळून आल्यास, संबंधित अग्निशमन वाहनावरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अग्निशमनाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर बचावकार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनाचे नोंदणी क्रमांकासह छायाचित्रे काढून वरिष्ठांच्या परवानगीने संबंधित पोलिस ठाण्यात जमा करावे. तसेच, संबंधित वाहनमालकांवर पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तक्रार आल्यास पोलिसांकडे वर्ग करणार

महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या कारवाईमुळे मुंबईतील नागरिकांकडूनही अनधिकृत पार्किंगबाबत मुंबई अग्निशमन दलाकडे तक्रार येण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत महानगरपालिका प्रशासनाने कार्यप्रणाली ठरविली आहे. अशाप्रकारच्या अनधिकृत पार्किंगबाबत नागरिकांनी तक्रार केली, तर संभाव्य तक्रार संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस विभाग व संबंधित विभाग कार्यालयाकडे योग्य कारवाईसाठी वर्ग करून तक्रारदारास माहिती देण्याचे आदेश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी दिली.