चार कर्मचारी जखमी; पेटते सिलिंडर आसपासच्या इमारती, वस्तीत

मुंबई : वर्सोव्यातील यारी रोड परिसरातील भरवस्तीत असलेल्या गॅस सिलिंडरच्या बेकायदा गोदामात सिलिंडरचा स्फोट होऊन बुधवारी सकाळी भीषण आग लागली. गोदामात काम करणारे चार कर्मचारी आगीत होरपळले असून त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिलिंडर स्फोटांमुळे परिसरातील इमारती आणि घरांचे मोठे नुकसान झाले.

वर्सोव्यातील यारी रोडवरील अंजुमन इस्लाम शाळेच्या समोरच हे गॅसचे गोदाम आहे. बुधवारी सकाळी ९.३०च्या सुमारास या गोदामातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. त्यानंतर काही वेळातच गोदामातील इतर सिलिंडरांनी पेट घेतला. अग्निशमन दलाची आठ वाहने, आठ पाण्याचे टँकर यांच्या ताफ्याने सकाळी साडेअकराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आग आटोक्यात आल्यानंतरही भरलेल्या गॅस सिलिंडरचा पुन्हा स्फोट होऊ नये यासाठी अग्निशमन दलाकडून दुपारी उशिरापर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरू होते. या घटनेत राकेश कडू (३०) आणि लक्ष्मण कुमावत (२४) हे ४० टक्के भाजले. तर मुकेश कुमावत (२०) आणि मंजित खान (२०) हे ६० टक्के भाजल्याची माहिती पालिकेने दिली.

सिलिंडरच्या स्फोटामुळे या गोदामाला लागूनच असलेल्या बैठ्या चाळीतील दोन घरांच्या भिंतींना तडे गेले. तर चाळीतील सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळली. स्फोटातील काही सिलिंडर उडून नजीकच्या सरला सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एका इमारतीत जाऊन कोसळला. त्यामुळे इमारतीतील तन्वीर लालानी यांच्या सदनिकेत आग लागली.  ‘आग लागल्यानंतर काही वेळाने अग्निशमन दलाने सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्हाला घर रिकामे करायला सांगितले. थोड्या वेळाने गॅस सिलिंडरच्या स्फोटात सिलिंडरचे तुकडे घरात शिरून आग लागली. आगीत घरातील एक खोली जळून खाक झाली. घरातील सुमारे तीन ते चार लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले,’ अशी व्यथा तन्वीर लालानी यांनी मांडली.