मुंबई : केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत राज्यात एक कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढला आहे. राज्यात एकूण शेतकरी खातेदार १.७१ कोटी आहेत. त्यापैकी एक लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, अद्याप सुमारे ७० लाख खातेदारांनी नोंदणी करणे बाकी आहे.
कृषी विभागातून दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने देशभरात ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक देणे सुरू केले आहे. या योजनेंतर्गत नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढल्या शिवाय केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. देशात उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
राज्यात मेअखेर १.७१ कोटी शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ कोटी २६ हजार शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढला आहे. अद्यापही सुमारे ७० लाख शेतकरी खातेदार बाकी आहेत. त्यापैकी सर्वच्या सर्व खातेदारांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढणे गरजेचे आहे. पण, ज्या शेतकऱ्यांना सरकारच्या कोणत्याही योजनेचा फायदा घ्यायचा नाही. असे शेतकरी, फार्म हाऊस सारखे बांधकाम करण्यासाठी खरेदी केलेली शेती, शहरांच्या शेजारील चार – पाच गुंठे शेत जमिनी, ज्या जमिनीवर शेती होत नाही आणि त्या जमिनीचे गुंठेवारीही झाली नाही आणि असे शेतकरी ज्यांना सरकारच्या कोणत्याही योजनेची मदत घ्यावयाची नाही, अशा शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यामुळे पूर्ण १.७१ कोटी शेतकऱ्यांकडून नोंदणी होणे शक्य नाही. कृषी विभागालाही १.२६ कोटी शेतकरी नोंदणी करतील, असे अपेक्षित आहे.
ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य
केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनीही शक्य तितक्या लवकर शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.