गुन्हे शाखेच्या पथकाने नवी मुंबईतील नेरूळ येथे कारवाई करून वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या १७ महिलांची सुटका केली आहे. यावेळी ९ दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परराज्यातील महिलांना काम देण्याचे आमीष दाखवून आरोपी त्यांना मुंबईत आणून वेश्याव्यवसायात ढकलत असल्याची माहिती यावेळी उघड झाली आहे.

तक्रारदार तरूणी ही २३ वर्षांची असूनमूळची कोलकाता येथील रहिवासी आहे. आरोपी राजू याने तिला घरकामाची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन नवी मुंबईतील नेरूळ येथील शिरोना गाव येथे आणले. या तरूणीने समाजसेवी संस्थेच्या अधिकाऱ्याच्या मदतीने याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी राजू, साहिल व इतर साथीदारांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

तरूणींना कामाचे आश्वासन देऊन आरोपी नेरूळ येथे नेऊन डांबून ठेवायचे. तरूणींना मारहाण करून जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलायचे. तरूणी पळून जाऊ नये म्हणून त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल काढून घ्यायचे. तक्रारदार तरूणीचा मोबाईल व दागिने असा ११ हजार ३०० रुपयांचा मुद्देमालही आरोपींनी काढून घेतला होता.

पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चार पथके तयार केली. त्यांच्या माध्यमातून नेरूळ येथील शिरोना गाव येथील आरोपींच्या ठिकाण्यावर छापा मारून १७ मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत ९ दलालांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून तीन हजार ७५० रुपये रोख व ८ मोबाइल संच पोलिसांनी जप्त केले आहेत. यावेळी एका तरूणीच्या अल्पवयीन भावाचीही पोलिसांनी सुटका केली. सर्व आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.