मुंबई : भारतातील वाढती बेरोजगारी आता केवळ तरुणांच्या भवितव्यावरच नाही कुटुंबीय व घताली वृद्धांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. लाँगिट्युडिनल एजिंग सर्व्हे ऑफ इंडिया (लासी) च्या ताज्या आकडेवारीनुसार ज्या कुटुंबांमध्ये मुलं बेरोजगार आहेत, त्या घरातील वृद्ध पालकांमध्ये नैराश्याचा धोका सुमारे १२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
अभ्यासानुसार, भारतातील पारंपरिक कुटुंबव्यवस्थेत वृद्ध पालक आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या मुलांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. त्यामुळे मुलांचे रोजगार गेले किंवा ते बेरोजगार राहिले, तर त्याचा थेट परिणाम पालकांच्या मानसिक स्थितीवर होतो. तज्ञांच्या मते, उत्पन्नाचा अभाव, भविष्यातील असुरक्षितता आणि सामाजिक दबाव यामुळे वृद्धांमध्ये ताण आणि नैराश्य वाढते.या अभ्यासातील एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, कुटुंबातील मोठा मुलगा बेरोजगार असल्यास वृद्धांच्या मानसिक आरोग्यावर अधिक गंभीर परिणाम दिसून येतो. भारतीय समाजातील पारंपरिक अपेक्षांनुसार मोठा मुलगा कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जात असल्याने, त्याच्या बेरोजगारीचा मानसिक धक्का पालकांना अधिक बसतो.
हा निष्कर्ष ४५ वर्षांवरील ७३ हजारांहून अधिक व्यक्तींच्या माहितीवर आधारित असून, देशातील वृद्धांच्या स्थितीचे व्यापक चित्र समोर आणतो. संशोधकांनी नमूद केले आहे की बेरोजगारी ही केवळ आर्थिक समस्या नसून ती कुटुंबाच्या मानसिक आरोग्याशीही घट्ट जोडलेली आहे.अहवालात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. ज्या वृद्धांचा सामाजिक संपर्क कमी आहे किंवा जे समाजात सक्रिय नाहीत, त्यांच्यात नैराश्याचा धोका अधिक वाढतो. उलट, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या आणि सक्रिय जीवनशैली असलेल्या वृद्धांमध्ये हा धोका तुलनेने कमी आढळतो.
तसेच ज्या राज्यांमध्ये आर्थिक विषमता अधिक आहे, तिथे ही समस्या अधिक तीव्र असल्याचेही आढळून आले आहे. आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्याचा अभाव असलेल्या भागांमध्ये वृद्ध अधिक असुरक्षित ठरत आहेत. केंद्र शासनाने २०१७ साली जाहीर केलेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात २०२२ पर्यंत आरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करण्याचे जाहीर केले होते. तथापि २०२६ च्या अर्थसंकल्पातही आरोग्यावरील खर्च २ टक्यापेक्षा कमी आहे. याचा फटका अनेक राज्यांना बसत असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था त्यातही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था दुबळी बनत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मानसिक आरोग्यच्या बाबतीत आपली अवस्था दयनीय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तज्ञांनी या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. रोजगारनिर्मिती वाढवणे, वृद्धांसाठी मानसिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि सामाजिक सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे या उपाययोजना आवश्यक असल्याचे ते म्हणतात.दरम्यान, वाढती बेरोजगारी आणि वृद्धांमधील नैराश्य यामुळे भारतासमोर दुहेरी संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे.
