मुंबई : लोकशाही व्यवस्थेत अधिकाऱ्यांच्या हाती दीर्घकाळ सत्ता राहणे चुकीचे असते. मुंबई महानगरपालिकेसह सर्वच पालिकांवर प्रशासकांची राजवट जास्त काळ राहता कामा नये, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले. राज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या आणि पालिकेतील एकूणच गैरप्रकारांना आळा बसल्याचेही फडणवीस म्हणाले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 दिवाळीनिमित्त पत्रकारांशी गप्पा मारताना राज्यातील राजकारणापासून ते आपल्या आवडीनिवडी, लहानपणीचे किस्से यासह अनेक मुद्दय़ांवर फडणवीस यांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली. मुंबई महापालिकेत अलीकडच्या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने बदल्या होत आहेत. काही साहाय्यक आयुक्तांच्या वारंवार बदल्या करण्यात आल्या. तसेच प्रशासकीय राजवटीत गैरप्रकार होत आहे, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी राज्यात सत्ताबदल होताच अधिकाऱ्यांच्या नेहमीच बदल्या केल्या जातात, असे स्पष्ट केले. या बदल्यांबाबत काही जणांनी शंका व्यक्त केली होती. संबंधितांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे सत्र आता थांबले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.  

मुंबईसह अन्य महापालिकांवर दीर्घकाळ प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रशासकीय राजवटीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांवर आता अंकुश आला आहे. मुंबई महापालिकेच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करीत फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याला टोला लगावल्याचे मानले जाते. मुंबईसह राज्यातील अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. या निवडणुका जानेवारी वा फेब्रुवारीत होतील, असे गृहित धरून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

 राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांसह विरोधकांकडून भरपाईची मागणी करण्यात येत आहे, याविषयी फडणवीस म्हणाले, गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टी वगळता त्याआधीच्या सर्व नैसर्गिक आपत्तींसाठी भरपाई देण्यात आली आहे. आम्ही आधीच्या सरकारप्रमाणे केवळ मदतीच्या घोषणा करीत नाही, लगेच महिनाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होते. या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांनाही मदत देण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल.

 ‘वर्षां’पेक्षा ‘सागर’ उत्तम

 पुन्हा मुख्यमंत्री कधी होणार आणि ‘वर्षां’ निवासस्थानी राहायला जाणार का, या प्रश्नांवर फडणवीस यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले. ‘‘मी सध्याच्या ‘सागर’ निवासस्थानी मजेत आहे. ‘वर्षां’ म्हणजे पाऊस आणि पाऊस सागरालाच मिळतो. त्यामुळे ‘वर्षां’वर जाण्याचा कोणताही विचार नाही. नवी दिल्लीला ‘सागर’च नसल्याने तेथे जाण्याचाही प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर हास्यकल्लोळ झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होईल, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

गाडय़ा चालवण्याची हौस

फडणवीस यांनी राजकीय मुद्दय़ांबरोबरच आपल्या आवडीनिवडींबाबतच्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली. मला चांगली उंची असलेल्या नवनवीन गाडय़ा चालवायला आवडतात. त्यामुळे चांगली गाडी घेऊन कोणी भेटायला आले, की मी त्यांना रात्री बोलावतो आणि एक-दीड तास गाडीतून मनसोक्त फिरतो. तसा मी खादाडच आहे आणि सर्वच पदार्थ आवडतात. भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि राग येतो. त्यामुळे मी रागावल्यावर मला खायला मिळाले की लगेच राग निवळतो. चांगली तब्येत राखण्यासाठी मनात आले की एक-दीड महिना व्यायामशाळेत जातो आणि पुन्हा सहा महिने तिकडे फिरकत नाही, असे फडणवीस म्हणाले. मी शक्यतो पाच तास झोप घेतो. मध्यरात्री तीनला झोपतो आणि सकाळी आठला उठतो. पण आठवडय़ातून दोन-तीनदा सकाळी सात-आठलाच लवकर बाहेर पडावे लागते. त्यामुळे अतिशय कमी झोपेची मला वर्षांनुवर्षे सवय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर रात्री उशिराच काय पहाटेपर्यंत फिरतात. त्यामुळे ते नेमके झोपतात कधी, हा संशोधनाचा विषय आहे, असे फडणवीस म्हणाले.

‘राजकारणाील कटुता कमी करण्यावर भर’

‘‘महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे, एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, अशी कबुली फडणवीस यांनी दिली. ही कटुता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची अशी राजकीय संस्कृती नाही. राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांतील नेते एकमेकांशी बोलू शकतात. त्यामुळे ही कटुता कशी कमी करता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे फडणवीस म्हणाले. ही कटुता कमी करण्यासाठीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार का, या प्रश्नावर अजून शुभेच्छा दिलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unfair long regime administrators in municipalities deputy chief minister devendra fadnavis statement ysh
First published on: 26-10-2022 at 00:02 IST