मुंबई : बदलती जीवनशैली, जंक फूडचे वाढते प्रमाण आणि संतुलित आहाराचा अभाव यामुळे भारतातील मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे पूर्वी प्रौढांमध्ये आढळणारे अनेक आजार आता लहान मुलांमध्ये दिसू लागले आहेत. त्यामुळे भविष्यातील पिढीच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे

लहान मुलांमध्ये लठ्ठपणा, प्री-डायबेटीस, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. या आजारांचे प्रमाण पूर्वी प्रामुख्याने प्रौढांमध्ये दिसत होते. मात्र आता १० ते १५ वर्षांच्या मुलांमध्येही अशा आजारांची लक्षणे दिसू लागल्याने डॉक्टरांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.यामागील मुख्य कारण म्हणजे मुलांच्या आहारातील मोठे बदल. पॅकेज्ड स्नॅक्स, फास्ट फूड, साखरयुक्त पेये आणि तेलकट पदार्थ यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे फळे, भाज्या, कडधान्ये आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात अभाव आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणमूल्ये मिळत नाहीत आणि विविध आजारांचा धोका वाढत असल्याचे ठाणे येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ संदीप केळकर यांनी सांगितले.

शहरी भागात ही समस्या अधिक तीव्र असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. शाळा, ट्युशन आणि स्क्रीनसमोर घालवला जाणारा जास्त वेळ यामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे. त्याचबरोबर जंक फूडच्या जाहिराती आणि आकर्षक पॅकेजिंगमुळे मुलांमध्ये अशा पदार्थांची सवय वाढत आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, बालपणात तयार होणाऱ्या आहाराच्या सवयी आयुष्यभर टिकतात. जर लहानपणीच चुकीच्या सवयी लागल्या, तर भविष्यात हृदयविकार, मधुमेह आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका अनेकपटीने वाढतो. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते असेही डॉ केळकर म्हणाले.

तज्ज्ञांनी पालकांनाही याबाबत सावध केले आहे. व्यस्त दिनचर्येमुळे अनेक पालक मुलांना तयार पदार्थ किंवा बाहेरचे खाणे देतात. मात्र यामुळे मुलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या आहारात संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.डॉक्टरांच्या मते, मुलांना रोज फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, दूध आणि प्रथिनेयुक्त पदार्थ देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जंक फूड, साखरयुक्त पेये आणि जास्त तेलकट पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवले पाहिजे. नियमित व्यायाम, खेळ आणि शारीरिक हालचालींनाही प्रोत्साहन देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की, आजच योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात जीवनशैलीशी संबंधित आजारांनी ग्रस्त होऊ शकते. त्यामुळे कुटुंब, शाळा आणि समाज या सर्वांनी मिळून मुलांमध्ये आरोग्यदायी आहार आणि सक्रिय जीवनशैलीची सवय लावणे अत्यावश्यक झाले आहे.प्रामुख्याने मैदानी खेळासाठी पालकांनी आग्रही असणे आवश्यक आहे.