सामाजिक परिवर्तन चळवळीतील तरुणांना प्रोत्साहन आवश्यक

मुंबई : सामाजिक परिवर्तन चळवळीतील तरुणांना प्रोत्साहन आवश्यक असल्याचे नमूद करीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी विरोधी मतांचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शनिवारी केले. सध्याच्या राजकारणात प्रतिभावान तरुणांचा सहभाग कमी होत असला तरी त्यांना अपेक्षित आदर्शवाद याच चळवळीतून पुढे येईल. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अशा तरुणांचे योगदान महत्वाचे आहे, असे यादव म्हणाले.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा शनिवारी मुंबईत रंगला. या सोहळय़ात विविध क्षेत्रांतील १७ प्रज्ञावंतांना भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक पातळीवर पर्यावरण क्षेत्रातील देशाची कामगिरी, सौर किंवा अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात देशाने गाठलेली उंची, तरुणांच्या सामाजिक चळवळी आणि राज्यातील राजकीय परिस्थिती अशा विविधांगी मुद्दय़ांवर यादव यांनी यावेळी मनमोकळेपणे भाष्य केले. ‘‘प्राचीन पतंजली योग सूत्रातून जीवनमूल्ये आणि तत्त्वे यांचे बहुमोल मार्गदर्शन होते. भारतीय जीवनशैली ही केवळ जगण्याचा नव्हे, तर मानवी मनाचाही विचार करते’’, असे यादव यांनी नमूद केले. जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने भारताने दिलेली अभिवचने वेळेआधीच पूर्ण होतील. सौर किंवा अपारंपारिक ऊर्जा निर्मिती २०३० पर्यंत ५० टक्क्यांचे उद्दिष्ट निश्चितच साध्य करेल, असा विश्वासही यादव यांनी व्यक्त केला.

Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार

‘‘कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जगाला भारताने काही उद्दिष्टे साध्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ऊर्जा ही देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या जीवनशैलीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ती निर्माण करण्यासाठी होत असलेला कोळशाचा वापर पूर्णपणे बंद करणे भारताला सध्या तरी शक्य होणार नाही. पण, हरित ऊर्जा निर्मितीमध्ये सौरऊर्जेत देशाने मोठी प्रगती केली आहे. जागतिक पर्यावरणाला न्याय देताना नागरिकांच्या गरजांचाही विचार करावा लागेल. जगातील प्रगत देशांचे कार्बन उत्सर्जन ६० टक्के असून, भारताचे केवळ चार टक्के आहे. भारताची मोठी लोकसंख्या लक्षात घेता अन्य देशांच्या तुलनेत ते कमी आहे. मात्र, जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी भारत आवश्यक योगदान देईल आणि मुदतीआधीच हरित ऊर्जा निर्मितीची उद्दिष्टे साध्य करेल, असेही यादव यांनी स्पष्ट केले.

‘‘प्रतिभावान तरुण राजकारणात फारसे सक्रियपणे उतरत नसल्याचे चित्र सध्या असले तरी प्रत्येक पिढीत बदल होत असतात. १९४०च्या दशकाचा विचार केला, तर नेताजी सुभाषचंद्र बोस आयसीएस होऊन परत आले, महात्मा गांधी बॅरिस्टर होऊन आले, पंडित जवाहरलाल नेहरू, राम मनोहर लोहिया हेही परदेशातून शिक्षण घेऊन आले आणि राजकारणात उतरले. विद्यार्थी चळवळीतून १९७० च्या दशकात अनेक उच्चशिक्षित नेते राजकारणात आले. चळवळीतून राजकारणात येण्याचा हा प्रवाह सध्या आटलेला दिसतो, हे मान्य करावे लागेल. तरुणांच्या चळवळीतील मते विद्रोही वाटली, तरी तो सामाजिक मुद्दय़ांना मिळालेला प्रतिसाद असतो. त्याचा आदर राखून तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे’’, असे मत यादव यांनी व्यक्त केले.

 भूपेंद्र यादव म्हणाले..

– अन्याय, अभाव आणि अज्ञान दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

– भारतीय जीवनशैली मानवी मनाचाही विचार करते

– गॅस सिलिंडर अनुदान सुरू ठेवणे दारिद्रय़निर्मूलनासाठी आवश्यक

यंदाचे लोकसत्ता तरुण तेजांकित

’विज्ञान : अभिजीत गड्डे, दर्शना पाटील

’प्रशासन : तेजस्वी सातपुते

’सामाजिक : अदिती मुटाटकर-आठल्ये, अद्वैत दंडवते,  संदीप शिंदे

’उद्योग : पल्लवी उटगी

’नवउद्यमी : शशांक निमकर

’गिर्यारोहण : हर्षांली वर्तक

’क्रीडा : रिशांक देवाडिगा,

रुद्रांक्ष पाटील

’कला : अनघा मोडक

’लोककला : कृष्णाई उळेकर

’साहित्य : प्रणव सखदेव

’मनोरंजन : नीरज शिरवईकर, अमेय वाघ, संकर्षण कऱ्हाडे