मुंबई : विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या प्रज्ञावंतांचा सन्मान सोहळा आज, शनिवारी मुंबईत रंगणार आहे. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या पाचव्या पर्वात निवडलेल्या १७ ‘तरुण तेजांकितां’ना या सोहळय़ात केंद्रीय कामगार, रोजगार व पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
गुणवत्ता, कल्पकता, कठोर परिश्रम आणि सातत्य अशा विविध कसोटय़ांवर स्वत:ला सिद्ध करणाऱ्या तरुणांचे कर्तृत्व देशाच्या सोनेरी भविष्याचा पाया ठरते. गेल्या चार वर्षांपासून या प्रज्ञावंतांना ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. कला, क्रीडा, विज्ञान-संशोधन, नवउद्यमी, कायदा, प्रशासन, समाजकार्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कामातून नवे मापदंड निर्माण करणाऱ्या ६२ ‘तेजांकितां’ना आतापर्यंत या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १७ प्रज्ञावंतांची यंदा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधन विकास विभागाचे संचालक डॉ. मििलद अत्रे, ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद बंग यांच्या परीक्षक समितीने निवडलेल्या या ‘तरुण तेजांकितां’चा सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळा रागदारीच्या सुरेल संगीतात न्हाऊन निघणार आहे. शास्त्रीय संगीतातील फ्युजन संगीत प्रयोगासाठी ओळखले जाणारे अभिजीत पोहनकर या पुरस्कार सोहळय़ात ‘बॉलीवूड घराना’ हा रागदारीवर आधारित लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळय़ामागचे उद्दिष्ट, पाचव्या पर्वापर्यंतची दिमाखदार वाटचाल, उमेदीच्या काळात केलेल्या कामासाठी पुरस्कार मिळवणाऱ्या प्रज्ञावंतांची धडपड, त्यांचा आजवरचा प्रवास हे सगळे उपस्थितांपर्यंत आपल्या खुमासदार निवेदनातून पोहोचवण्याची जबाबदारी प्रसिध्द अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले सांभाळणार आहेत.
केंद्रीय कामगार, रोजगार व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रांतील अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.