केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर राजकीय वातावरण तापलं आहे. नाशिक, पुणे, महाड व ठाणे या चार ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राणेंविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली होती. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेले एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हणाले होते राणे?

भाजपतर्फे राज्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरू आहेत. त्यापैकी कोकण विभागाची यात्रा १९ ऑगस्टला मुंबईहून सुरू झाली. सोमवारी ती महाडमध्ये आली असता तेथील पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा संदर्भ दिला. ‘‘यंदाचा स्वातंत्र्यदिन हीरक महोत्सव की अमृत महोत्सव, अशी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली तेव्हा मी त्या ठिकाणी असतो, तर कानाखाली चढवली असती’’, असे आक्षेपार्ह विधान राणे यांनी केले. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले.

अटकनाट्य

नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची कोकण विभागीय जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चिपळूणहून संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे पोहोचली. तेथील गोळवलकर गुरुजी स्मारकामध्ये कार्यक्रम आटोपून अल्पोपहार सुरू असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आपल्या ताफ्यासह तिथे दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अटक होऊ  नये, अशी मागणी करणारा राणे यांचा अर्ज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जनआशीर्वाद यात्रेत स्वत: राणेंसह त्यांचे चिरंजीव नितेश, नीलेश, आमदार प्रसाद लाड, यात्रेचे कोकण विभागीयप्रमुख प्रमोद जठार इत्यादींनी कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रे दाखवण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करत तिथेच ठिय्या मांडला. अटक वॉरंट दाखवले नाही तर तिथून न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. अखेर पोलीस अधीक्षक गर्ग यांनी राणे यांची समजूत काढून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे महाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

राणे यांना रात्री साडेआठच्या सुमारास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रथमवर्ग दंडाधिकारी बाबासाहेब शेखपाटील यांच्यापुढे  हजर करण्यात आले. यावेळी राणे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, राणे यांना अटक करण्यापूर्वी नोटीस दिली नाही, अटक चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणे यांची जामिनावर सुटका केली.

या सर्व घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर महाडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने महाड परिसरात तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिकांनी नांगलवाडी फाटा येथे काळे झेंडे दाखवून राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडय़ांवर दगडफेक झाल्याचा आरोप यावेळी केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.