scorecardresearch

राणे यांची शिवसेनेवर टीका, सेनेचेही प्रत्युत्तर

राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावरून मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजाविताच राणे यांनी ‘मातोश्री’तील चौघांना ‘ईडी’ची नोटीस बजाविली जाणार असल्याचे जाहीर केले होते.

Notice to Narayan Rane regarding bungalow in Juhu
नारायण राणे (संग्रहीत छायाचित्र)

मुंबई: शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील कलगीतुरा दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. राणे यांनी ‘मातोश्री’च्या बांधकामावरून शिवसेनेला लक्ष्य करताच शिवसेनेने राणे यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी तेव्हा केलेल्या आरोपांच्या चित्रफितीच सादर केल्या.  राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावरून मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजाविताच राणे यांनी ‘मातोश्री’तील चौघांना ‘ईडी’ची नोटीस बजाविली जाणार असल्याचे जाहीर केले होते. हा वाद सुरू असतानाच राणे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा शिवसेनेवर हल्ला चढविला. माझ्या बंगल्याला नोटीस देता, पण ठाकरे यांच्या मातोश्री-२ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष का, असा सवाल राणे यांनी केला. छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच ‘मातोश्री’वरील एक जण तुरुंगात जाईल, असा इशाराही दिला.

राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ईडीचे अधिकारी हे भाजपच्या सल्ल्यानुसार काम करतात का, असा सवाल राऊत यांनी केला. राणे हे काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलेल्या भाषणाची चित्रफीतच राऊत यांनी सादर केली. राणे यांच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यांची सारी माहिती त्यात होती.

तसेच किरीट सोमय्या यांनी ‘अविधना’ इमारतीमधील व्यवहारात राणे यांनी ३०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोपाची चित्रफीतही सादर केली. भाजपमध्ये गेल्यावर राणे यांच्यावरील आरोप माफ झाले का, असा सवालही त्यांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister narayan rane shiv sena bjp leaders akp

ताज्या बातम्या