मुंबई : मुंबईसह भारतातील मोठ्या प्रमुख शहरांमधून गेल्या काही वर्षांत ‘कोल्डप्ले’, ‘एड शीरान’ अशा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील गायक-गायिका, म्युझिक बँड्स यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित होत आहेत. या कार्यक्रमांना देशभरातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यासाठी चढ्या दरातील तिकीट विक्री, व्हीआयपी कार्यक्रमांचा अनुभव, हॉस्पिटॅलिटी आणि अन्य क्षेत्रातील सेवासुविधांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पनांत शंभर टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यातूनच येत्या काळात इव्हेंट आणि संगीत पर्यटन हे दोन नवे उद्योग वाढीस लागणार आहेत, अशी माहिती ‘इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी : अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पिरेटिव्ह’ नामक श्वेतपत्रिकेत देण्यात आली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच इव्हेंट एफएक्यूज मीडिया यांनी एकत्रितरित्या तयार केलेल्या ‘इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी : अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पिरेटिव्ह’ या श्वेतपत्रिकेचे प्रकाशन ‘वेव्हज’ परिषदेत शनिवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, संयुक्त सचिव मीनू बात्रा आणि प्रिथुल कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आजवर असंघटित असलेले लाईव्ह एन्टरटेन्मेट क्षेत्रात सध्या मोठ्या उलाढाली होत असल्याने लवकरच हे क्षेत्र संघटित उद्याोग म्हणून नावारुपाला येत आहे, असे या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणात उत्पन्न

गेल्या वर्षभरात भारतात अनेक मोठमोठे आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रम आणि इव्हेंट्स आयोजित करण्यात आले होते. हे कार्यक्रम पाहण्यासाठी एका शहरातून वा एका राज्यातून दुसऱ्या शहरात, राज्यात अनेक लोक प्रवास करतात. त्यातूनच संगीत पर्यटन हा नवाच उद्याोग वेगाने विकसित होतो आहे. अशा छोट्या-मोठ्या इव्हेंट्सच्या आयोजनातून तात्कालिक स्वरुपाचे का होईना २ ते ५ हजार रोजगार उपलब्ध होतात. याशिवाय, या कार्यक्रमांची तिकीट विक्री, कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांबरोबरच प्रेक्षकांचीही निवास, खानपान व्यवस्था यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असल्याची माहिती श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आली आहे.

महत्त्वाचे अहवाल प्रकाशित

‘वेव्हज’ परिषदेंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या श्वेतपत्रिकेसह ‘स्टॅटिस्टिकल हॅण्डबुक ऑन मीडिा अॅण्ड एन्टरटेन्मेट सेक्टर २०२४ – २५’, ‘फ्रॉम कन्टेन्ट टु कॉमर्स : मॅपिंग इंडियाज क्रिएटर इकॉनॉमी’ हा बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा अहवाल, ‘अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया’ हा ई अॅण्ड वायचा अहवाल आणि खेतान अॅण्ड कंपनीचा ‘लीगल करंट्स : अ रेग्युलेटरी हॅण्डबुक ऑन इंडियाज मीडिया अॅण्ड एन्टरटेन्मेट सेक्टर २०२५’ अशा महत्त्वाच्या आर्थिक अहवालांचे प्रकाशन शनिवारी करण्यात आले.