अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सच्या बोइंग ७७७ या विमानाच्या उजव्या बाजूकडील इंजिनावरचे आवरण अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे अभियंत्यांना आढळल्याने हे विमान गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावरच थांबवावे लागले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
यूए-४८ क्रमांकाचे सदर विमान नेवार्कहून गुरुवारी रात्री मुंबईत आले तेव्हा अभियंत्यांना त्या विमानाच्या उजव्या बाजूकडील इंजिनाचे आवरण अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या विमानाची तपासणी करून विमानाचे उड्डाण थांबविले. आवरणाची मोठय़ा प्रमाणावर हानी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानाचे उड्डाण होताना इंजिनाच्या आवरणाला धक्का पोहोचला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानातून सर्व प्रवासी उतरल्यानंतर ते परतीच्या प्रवासासाठी उड्डाणाच्या तयारीत असताना आवरणाची हानी झाल्याचे आढळले, असे सूत्रांनी सांगितले.