United Maharashtra Movement Sharad Pawar Bhujbal Shinde Fadnavis government Mumbai news ysh 95 | Loksatta

X

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन तेव्हा आणि आता..

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी डोळे वटारताच शिंदे-फडणवीस सरकारने नरमाईची भूमिका घेत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा बेळगावचा दौरा रद्द केला.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन तेव्हा आणि आता..

शरद पवार, भुजबळ आदी बंदीहुकूम मोडून धडकले

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी डोळे वटारताच शिंदे-फडणवीस सरकारने नरमाईची भूमिका घेत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा बेळगावचा दौरा रद्द केला. तीन दशकांपूर्वी कर्नाटक सरकारचा बंदीहुकूम मोडून शरद पवार, छगन भुजबळ आदी नेत्यांनी पोलिसांचा डोळा चुकवत बेळगावात धडक मारली होती. पवार व भुजबळांसह विविध नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी चांगलाच चोपही दिला होता. या पार्श्वभूमीवर दोन मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने तेव्हाचा काळ कुठे आणि आजचा काळ कुठे, असे सूचक ट्वीट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सीमा भागातील नागरिकांवर करण्यात आलेल्या कानडी सक्तीच्या विरोधात राज्यातील नेत्यांनी बंदीहुकूम मोडून बेळगावमध्ये धडक दिली होती. १९८६ मध्ये विरोधी पक्षनेते असताना शरद पवार   पोलिसांची नजर चुकवून बेळगावात दाखल झाले होते. बेळगावमध्ये दाखल होण्यासाठी शरद पवार कोल्हापूरमध्ये दाखल झाले. माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर व चालकासह पवार फियाट गाडीतून बेळगावकडे रवाना झाले. वाहनाचे सारथ्य पवार यांनी स्वत:च केले तर चालकाला मागे बसविले होते. पोलिसांनी चौकशी केली असता पवारांनी चालक असल्याचे सांगितले. पोलिसांच्याही लक्षात आले नाही आणि पवार बेळगावात गोगटे यांच्या घरी पोहचले होते. दुसऱ्या दिवशी बेळगावमध्ये कानडी सक्तीच्या विरोधात झालेल्या आंदोलन पवारांच्या नेतृत्वाखाली झाले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पवार यांनाही प्रसाद मिळाला होता. एस. एम. जोशी शरद पवार यांची भेट घ्यायला गेले असता पाठीवरील वळ बघून वयोवृद्ध एस. एम. हळहळले होते, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.

छगन भुजबळ यांची बेळगाव भेट तर नाटय़मय घडली होती. भुजबळ व शिवसेना नेत्यांना रोखण्याकरिता कर्नाटक पोलिसांनी सीमेवर बंदोबस्त ठेवला होता. भुजबळ वेषांतर करून बेळगावात दाखल झाले होते. त्यासाठी भुजबळांनी मिशी उडविली होती. तसेच व्यापाराचा वेश परिधान केला होता. सीमेवर पोलिसांनी चौकशी केली असता व्यापारी असल्याची बतावणी भुजबळांनी केली होती.  बेळगावात भुजबळ आवतरले हे कर्नाटक पोलिसांना कळताच त्यांचा पारा पार चढला होता. भुजबळांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. ठाण्याचे सतीश प्रधान, मुंबईतील शिशिर शिंदे, दगडू सकपाळ आदींनाही पोलिसांनी पिटून काढले होते. हे सारे नेते महिनाभरापेक्षा जास्त काळ बेळगाव, बेल्लारीच्या तुरुंगात होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा