लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भरधाव वेगात धावणाऱ्या एका टँकरने गुरुवारी मानखुर्द परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या अज्ञात व्यक्तीला धडक दिली. या अपघातात सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द टी जंक्शन परिसरात गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. शीव येथून नवी मुंबईच्या दिशेने एक टँकर भरधाव वेगात जात होता. याचवेळी सदर व्यक्ती रस्ता ओलांडत असताना टँकरने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात सदर व्यक्ती गंभीरित्या जखमी झाली. काही स्थानिक रहिवाशांनी घटनेची माहिती मानखुर्द पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी व्यक्तीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.
उपचार सुरू असताना दुपारी त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ पोलिसांना कुठलेही ओळखपत्र सापडले नाही. त्यामुळे आद्यप त्याची ओळख पटलेली नाही. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी टँकरचालक अब्दुल शेख (३९) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.