मुंबई : रक्तदाब मोजणाऱ्या उपकरणांची विनापरवाना उत्पादन आणि विक्री करण्यात येत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए)च्या कारवाईतून समोर आले आहे. अपोलो फार्मसी आणि कन्सेप्टट्रानर व्हेंचर यांच्याकडून विनापरवाना या उपकरणांचे उत्पादन करत त्यांची विक्री करत होते. करोना काळात मोठय़ा प्रमाणावर उपकरणांची विक्री करण्यात आली असून गुणवत्ता चाचणी न करता ही उपकरणे विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर औषध आणि सौदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांविरोधात एफडीएकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १० लाख ३५ हजार रूपये किंमतीचा उपकरणांचा साठा जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

एफडीएला प्राप्त झालेल्या माहितीनुसार बृन्हमुंबई विभागाने (औषध) मे कन्सेप्टट्रानर व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, गोवंडी या कंपनीवर छापा टाकला. यावेळी रक्तदाब मोजणार्या उपकरणांचे विनापरवाना उत्पादन आणि विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. रक्तदाब मोजणाऱ्या उपकरणांच्या उत्पादनासाठीचा परवाना संपुष्टात आल्यानंतर कंपनीला जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर कंपनीने परवान्याचे नुतनीकरण न करता वा नवीन परवाना न घेता उत्पादन विक्री सुरूच ठेवली. करोना काळापासून या उपकरणांची मागणी प्रचंड वाढली आहे. याचा फायदा घेत या उपकरणांचे उत्पादन आणि विक्री मोठय़ा प्रमाणावर करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

उपकरणे परत घेण्याचे आदेश..

या पार्श्वभूमीवर औषधे आणि सौंदर्य प्रसाध कायदा तसेच वैद्यकीय उपकरणए नियम २०१७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि जागतिक महामारीच्या काळात विनापरवाना उपकरणांचे उत्पादन, विक्री केल्याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात या दोन्ही कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती एफडीएने दिली आहे. ४ मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही कंपन्यांकडून विकण्यात आलेली उपकरणे परत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार वर्तमानपत्रात नोटीस देत उपकरणे परत घेण्यास सांगण्यात आले आहे.