मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) अंतर्गत सहाय्यक कमांडट ( गट अ ) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून या अंतर्गत एकूण ३४९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयएसएफ ) यासह इतरही पोलीस दलांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारांना १२ मार्चच्या आत अर्ज भरावे लागतील. या भरती प्रक्रियेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली असून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील विविध पदांसाठी उमेदवारांना अर्जाद्वारे प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया?

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) – १०८ पदे, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयएसएफ) – ७० पदे, सशस्त्र सीमा दल (एसएसबी) – ५३ पदे, भारत – तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) १२ पदे अशा एकूण ३४९ पदांचा समावेश करण्यात आला आहे.

उमेदवार अर्जासाठी निकष काय?

भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच यासाठी उमेदवाराचे किमान वय १ ऑगस्ट २०२६ रोजी २० वर्षे तर कमाल वय २५ वर्षे असणे गरजेचे आहे. यात भरती प्रक्रियेच्या नियमानुसार अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमातींसाठी (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात येणार असून इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारांना ३ वर्षे सूट देण्यात येईल.

यासाठी खुला प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) प्रवर्गातील उमेदवारांना २०० रुपये परीक्षा शुल्क भरणे गरजेचे असणार आहे. तर अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्कातून सुट देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) ठरवून देण्यात आलेल्या नियमांची पूर्ती करूनच उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती, अर्ज उपलब्ध आहे.