मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगकाकडून घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत मुंबईमधील मालाड येथे राहणाऱ्या दिशांत अमृतलाल निसर याने उत्कृष्ट कामगिरी करत देशभरातून १९ वा क्रमांक (ऑल इंडिया रँक) मिळविला आहे. पहिल्या २० उमेदवारांमध्ये स्थान मिळविल्याने याबद्दल दिशांतचे कौतुक होत आहे.
दिशांतचे शिक्षण कोणत्या शाखेतील ?
दिशांतचे शिक्षण जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या (मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम) या विषयात मुंबई विद्यापीठातून झाले आहे. डिजिटल मीडिया, जर्नालिझम अँड पब्लिक ओपिनियनम, मार्केटिंग आणि पब्लिक रिलेशन आदी विषय त्याच्या आवडीचे आहेत. नागरी सेवा परीक्षत त्याला भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आदी सेवांमध्ये काम करण्याची संघी मिळू शकते. निकाल जाहीर झाल्यांनतर दिशांतची प्रतिक्रिया टिपणारा एक व्हिडीओ त्याच्या मित्राने समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. यात दिशांत आपला संपूर्ण भारतातून १९ वा क्रमांक पटकावला हे ऐकताच भारावून गेला आहे. तर त्याच्या मित्र – मैत्रिणींनी त्याचा निकाल ऐकताच जल्लोष करत त्याचे अभिनंद केले.
दिशांतच्या यशाचे रहस्य काय ?
खूप ज्ञान असण्यासोबतच आपल्या ते प्रभावीपणे मांडता यायला हवे असे दिशांतचे मत आहे. परंतु त्याचा अभाव असल्याने अनेक उमेदवारांची निवड होत नाही असे त्याने सांगितले. त्याने या आधी तीन वेळा नागरी सेवा परीक्षा दिली होती. त्याने पहिल्यांदा २०२२ मध्ये ही परीक्षा दिली होती. तेव्हा केवळ
दोन चुकीची उत्तरे दिल्याने तो गुणवत्तायादीतून बाहेर गेला. त्यांनतर त्याची २०२३ मध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यात निवड झाली होती. त्यावेळी मुलाखतीत कामगिरी कमी पडली आणि त्याला मुलाखतीत कमी गुण मिळाले. १५ गुणांसाठी त्याची निवड होऊ शकली नव्हती. त्यानंतर त्याने २०२४ मध्ये आधी केलेल्या चुका टाळत पूर्ण क्षमतेने अभ्यास करत ७७ वा क्रमांक मिळविला होता. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्याचे वैकल्पिक विषय होते. तर त्याने २०२५ साली पुन्हा परीक्षा देत देशात १९ वा क्रमांक मिळविला आहे. आपण पूर्ण लक्ष केंदित करून, तसेच आधी केलेल्या चुका टाळून अभ्यास करायला हवा असे मत त्याने व्यक्त केले.
