urban development department agree to give mumbai metro line 11 from wadala to csmt project to mmrc mumbai print news zws 70 | Loksatta

मुंबई : मेट्रो ११ मार्गिका अखेर एमएमआरसीकडे; प्रकल्प एमएमआरसीला देण्यास नगर विकास विभागाची संमती

या १२.७७४ किमी मार्गिकेतील ८.७७४ किमीचा मार्ग हा भुयारी असून उर्वरित ४ किमीचा मार्ग उन्नत आहे.

metro
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पातील मेट्रो ११ (वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) मार्गिकेची उभारणी आता एमएमआरडीएऐवजी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) करणार आहे. हा प्रकल्प एमएमआरसीकडे देण्याची मागणी अखेर नगर विकास विभागाने मान्य केली आहे. त्यानुसार या मार्गिकेच्या अंमलबजावणीची जबाबदारी एमएमआरसीकडे देण्याचा शासन निर्णय नुकताच नगर विकास विभागाने जाहीर केला आहे.

हेही वाचा >>> मुंबई: न्यायालयीन खर्चाची माहिती देण्यास एमएमआरसीचा नकार

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएकडून ३३६७ किमीचे जाळे विणले जात असून त्यात १४ मार्गिका आहेत. याच प्रकल्पातील वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो ११ ची उभारणी एमएमआरडीएकडून करण्यात येणार होती. त्यानुसार या कामाला सुरुवात करण्याची तयारी एमएमआरडीएकडून सुरु होती. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे काम प्रगतीपथावर होते, असे असताना आता या मार्गिकेचे काम एमएमआरसीकडून केले जाणार आहे. राज्य सरकारने या बाबतचा निर्णय घेतला आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएने ज्या स्वतंत्र अशा एमएमआरसी कंपनीची स्थापना केली, त्याच कंपनीने मेट्रो ११ ची उभारणी करण्याचीही तयारी दर्शवली होती. तसा प्रस्ताव एमएमआरसीने सादर केला होता.

हेही वाचा >>> मुंबई: घरी न परतलेल्या बारा वर्षांच्या मुलीचा आठ तासांत शोध

एमएमआरसीची ही मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार मेट्रो ११ ची अंमलबजावणी एमएमआरसीच्या माध्यमातून केली जाईल असा शासन निर्णय २५ जानेवारीला नगर विकास विभागाने जाहीर केला आहे. या १२.७७४ किमी मार्गिकेतील ८.७७४ किमीचा मार्ग हा भुयारी असून उर्वरित ४ किमीचा मार्ग उन्नत आहे. अशावेळी ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेच्या अंमलबजावणीचा अनुभव पाहता मेट्रो ११ ची जबाबदारी एमएमआरसीला देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान एमएमआरडीएने ही मार्गिका ३१ जानेवारीपर्यंत एमएमआरसीकडे हस्तांतरित करावी, याबाबतची माहिती, कागदपत्रे एमएमआरसीकडे सुपूर्द करावीत असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 19:52 IST
Next Story
मुंबई: न्यायालयीन खर्चाची माहिती देण्यास एमएमआरसीचा नकार