मुंबई : मुंबई प्रेस क्लब येथे जानेवारी महिन्यात आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थिती लावून जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने शनिवारी तेलुगू कवी वरवरा राव, वकील सुधा भारद्वाज, सामाजिक कार्यकर्ते व्हर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांचा जामीन रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे, राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) तडाखा मिळाला आहे.

या चौघांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे, त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी एनआयएने विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला होता. एनआयएचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आणि वरवरा राव, सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांचा जामीन कायम ठेवला.

या चौघांना जामीन मंजूर करताना त्यांनी एकमेकांच्या संपर्कात न राहण्याची अट घातली होती, असे असतानाही चौघांनी मुंबई प्रेस क्लब येथे जानेवारी महिन्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसे करून त्यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे, त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी एनआयएने केली होती. तर, प्रेस क्लबमधून निमंत्रण मिळाले म्हणून आपण त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तथापि, आपण इतर आरोपींशी संपर्क साधण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे, जामिनाच्या अटींचे आपण उल्लंघन केले नसल्याचा दावा चारही आरोपींनी एनआयएच्या अर्जावर उत्तर दाखल करताना केला होता.