आर्यन खानच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी नाही

विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर आर्यनने त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Aryan-Khan-33

मुंबई : कू्रझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मात्र आर्यनच्या याचिकेवर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) सुनावणी घेण्याचे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले.

विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर आर्यनने त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर आर्यनची याचिका गुरुवारी सादर करण्यात आली. त्या वेळी याचिकेवर शुक्रवारीच तातडीची सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांकडून करण्यात आली. परंतु केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयानेही एनसीबीची मागणी मान्य करत याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा दाखला देत तो नियमितपणे अमली पदार्थाबाबतच्या कृत्यांमध्ये सहभागी होता आणि त्याचा अमली पदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता, असे निरीक्षण विशेष सत्र न्यायालयाने नोंदवत आर्यनला जामीन देण्यास नकार दिला होता. शिवाय आर्यनवरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून गुन्ह्यातील त्याचा सहभागही सकृद्दर्शनी गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. 

‘एनसीबी’चे पथक मन्नतवर

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एसीबी) एक पथक  गुरुवारी अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर गेले होते. आर्यनशी संबंधित काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी  तपास अधिकारी व्ही. व्ही. सिंह  यांच्या नेतृत्वाखालील पथक  शाहरुखच्या मन्नत निवासस्थानी गेले होते, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली. आर्यनची शैक्षणिक व वैद्यकीय माहिती, तसेच आर्यनकडे दुसरा मोबाइल किंवा इतर कुठलीही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असल्यास ती सोपवण्याची मागणी एनसीबीने शाहरुखकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसल्याचे यावेळी एनसीबीने स्पष्ट केले.

शाहरुख आर्यनच्या भेटीस…

बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खान गुरुवारी सकाळी आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचला होता. यावेळी मुलाखत कक्षामध्ये त्याने सुमारे १८ मिनिटे इंटरकॉमद्वारे मुलाशी संवाद साधला. अमली पदार्थ प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यन प्रथमच शाहरुख खानला भेटला. सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर शाहरुखला आर्थर रोड कारागृहात प्रवेश मिळाला. सकाळी सव्वानऊ वाजता आलेला शाहरुख ९.३६ ला कारागृहातून बाहेर पडला. सुरक्षेच्या कारणावरून शाहरुख येण्यापूर्वीच सर्व परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Urgent hearing on aryan khan bail plea akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या