मुंबई : प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरुपात उपलब्ध व्हाव्या यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान भारत आरोग्य खाते कार्ड’ (आभा) काढण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांमध्ये अधिकाधिक नागरिकांचे ‘आभा’ कार्ड काढण्यासाठी ‘मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट’ अभियान हाती घेतले आहे.
मुंबईतील नागरिकांना ‘आभा’ कार्डच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा आणि उपचार सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत अधिकाधिक पात्र नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्यावर भर देण्याबरोबरच ७० हून अधिक वयोमान असलेल्या जेष्ठ नागरिकांचे ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ तयार करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या अभियानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केले.
मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट अभियानाची जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली असून, प्रत्येक प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त आणि उपायुक्त ‘आभा’ कार्ड नोंदणी अभियानाच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांची आरोग्य सुविधा नोंदणी करावी. तसेच सर्व पात्र डॉक्टर, परिचारिका, आयुष वैद्य, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आदींची आरोग्यसेवा व्यावसायिक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नोंदणीसाठी विशेष शिबिरे
अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात जनजागृती, अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि नोंदणी केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, प्रसूतिगृहे, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि शिधावाटप केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जाईल. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी घरपोच तसेच विशेष जनसंपर्क मोहीम राबविण्यात येईल. त्यांच्या नोंदणीसाठी विशेष शिबिरेही घेण्यात येतील.
आरोग्य स्वयंसेविकांच्या माध्यमातून नोंदणी
याशिवाय पात्र लाभार्थ्यांसाठी शिधावाटप केंद्रांवर प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्रतेची पडताळणी केल्यानंतर सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ही नोंदणी केली जाईल.
अभियानाचे उद्दिष्टे
आरोग्य नोंदी ‘आभा’शी जोडणे आणि महानगरपालिका रुग्णांमध्ये बाह्यरुग्ण सेवांमध्ये, ई प्रस्क्रिप्शन, ई डिस्चार्ज समरी, डिजिटल लॅब / रेडिओलॉजी अहवाल आणि इएमआर किंवा एचएमआयएस यासारख्या आयुष्मान डिजिटल भारत मिशनसोबतच्या सुसंगत डिजिटल सेवा वाढविणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत.
